नगरः आगामी निवडणुकांची चाहूल घेत काँग्रेसने राज्यात जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. त्यासाठी विभागवार नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्राची सुरुवात नगर शहरातून ज्येष्ठ नेते, माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थिती करण्यात आली, मात्र जिल्ह्यात काँग्रेस एकसंघ नसल्याचा फटका जनसंवाद यात्रेच्या नमनालाच बसला. त्यातून जनसंवाद ऐवजी काँग्रेसअंतर्गत विसंवादाचे चित्र निर्माण झाले. या नमनाला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अल्प उपस्थितीने धक्का दिला. त्यातून काँग्रेसच्या बळकटीकरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे.

मुळात जनसंवाद यात्रेची सुरुवात नगरमधून होत आहे, याची माहितीच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्याआभावी प्रतिसादाचा प्रश्न निर्माण झाला. शहरातील ऐतिहासिक भूईकोट किल्ल्यातून यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. या किल्ल्यात स्वातंत्र्य चळवळीत थोर स्वातंत्र्य सेनानींना ब्रिटिशांनी कैदेत ठेवले होते. किल्ल्यातील नेत्यांच्या या कक्षाशी काँग्रेसची नाळ जुळलेली आहे. मात्र त्याचे प्रतिबिंब प्रतिसादात उमटले नाही. त्यातूनच मग ऐनवेळी शहरातील काढली जाणारी पदयात्रा रद्द करावी लागली. नंतर झालेल्या सभेचे चित्र असेच राहीले. जनांशी संवाद साधलाच गेला नाही, मोजक्याच आणि नेहमीच्याच कार्यकर्त्यांपुरता तो मर्यादित राहिला.

nan patole
विशाल पाटलांवरील कारवाईस टाळाटाळ; सांगलीत काँग्रेस मेळाव्यात आघाडीचे काम करण्याचे आवाहन
Campaigning by BJP outside the polling station Congress complaint to the Commission
मतदान केंद्राबाहेरच भाजपकडून प्रचार; प्रशासन बघ्याच्या भूमिकेत, काँग्रेसची आयोगाकडे तक्रार
controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
shivraj patil chakurkar , shivajirao patil nilangekar
काँग्रेसच्या प्रचारातून चाकुरकर, निलंगेकराचे छायाचित्र गायब

हेही वाचा – नाराज पदाधिकाऱ्यांच्या जोरावर युवक काँग्रेसचे कुणाल राऊत ‘युथ जोडो-बुथ जोडो’ कसे यशस्वी करणार?

अर्थात ही सर्व जबाबदारी आणि नियोजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर सोपवलेले होते. राजेंद्र नागवडे गेली काही वर्षे काँग्रेसपासून अलिप्त होते. मध्यंतरी भाजपच्या जवळ गेले होते. आता काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाले आहेत. साखर कारखानदार आणि शिक्षण संस्था हाताशी असलेल्या राजेंद्र नागवडे आणि त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे या दाम्पत्यावर एकाचवेळी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. महाराष्ट्रातील असे हे अपवादात्मक उदाहरण मानावे लागेल.

जनसंवाद यात्रेची उत्तर महाराष्ट्राची सुरुवात नगर शहरातून होत असली तरी, हा कार्यक्रम म्हणजे ग्रामीण काँग्रेसने आयोजित केलेला. त्याच्याशी शहर काँग्रेसचा काय संबंध? इतकी अलिप्तता पदाधिकारी व कार्यकर्त्यांत दिसत होती. त्यामुळे शहरातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, ती ही केवळ ज्येष्ठ नेते थोरात यांना तोंड दाखवण्यापूर्तीच राहिली. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे नगरमध्ये पक्ष कार्यालयही नव्हते. थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु त्यांनी विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेस पक्ष कार्यालयाविना बेघर झाला होता. आता शहर आणि ग्रामीण काँग्रेस असे दोनदोन कार्यालये स्वतंत्र झाली आहेत. मात्र दोन्ही कार्यालयातील, पर्यायाने पदाधिकाऱ्यांतील विसंवाद जनसंवाद यात्रेतून उघड झाला.

कधीकाळी जिल्ह्यावर वर्चस्व ठेवत राज्य आणि देश पातळीवर कर्तुत्व गाजवणारी काँग्रेस आता संगमनेर, श्रीरामपूर, नगर शहर आणि श्रीगोंदा एवढीच मर्यादित राहिली आहे. इतर ठिकाणी तिचे अस्तित्व शोधून सापडावे लागते. तेच चित्र जनसंवाद यात्रेच्या नमनाला जाणवले. राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा काँग्रेसला आता बाळासाहेब थोरात हे एकमेव नेते राहिले आहेत. थोरात यांचे पक्षातील वरिष्ठ पातळीवरील स्थानही भक्कम झालेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे जिल्ह्यातील स्थान काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे गावागावात जनसंवाद यात्रा पोहोचणार कशी, हा प्रश्न अनुत्तीर्णच राहतो आहे.

हेही वाचा – हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, ओडिसामध्ये पक्ष बळकट होणार?

संगमनेर हा थोरात यांचा दीर्घकाळापासूनचा हक्काचा मतदारसंघ. तेथे काँग्रेसशिवाय इतर पक्षांना फारसे अस्तित्व नाही. श्रीरामपूरमध्ये आमदार लहू कानडे प्रतिनिधित्व करतात. तेथेही पक्षाचे अस्तित्व बदलत्या काळात टिकून राहिले, तरीही श्रीरामपूरसह नगर शहर आणि श्रीगोंद्यातील नव्या-जुन्यांचा वाद कायम धगधगता राहिला आहे. तो विझवणे थोरात यांना आजवर शक्य झालेले नाही. त्याचेही चित्र जनसंवाद यात्रेच्या नमनाला दिसले. अल्प उपस्थितीमागे तेही एक कारण आहे.

जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकीची तयारी करता येणार आहे. गावगावापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यातून नवे कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचे काम जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी करायचे आहे. पक्षाच्या बळकटीकरणाला त्यामुळे चालना मिळेल. ‘इंडिया’चा प्रभाव जनमानसात वाढताना दिसत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेला दि. ७ सप्टेंबरला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातही कार्यक्रम आयोजित केले जातील. – आमदार बाळासाहेब थोरात, माजीमंत्री, नगर.