महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपावरून सहमती होऊ शकलेली नाही. विशेषतः मुंबईतील जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वर्चस्वाचा वाद सुरू आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि ठाकरे गटाची मते परस्परांच्या उमेदवारांना हस्तांतरित होतील का, अशीही शंका घेतली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

महाविकास आघाडीत जागावाटप जवळपास पूर्ण झाले, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत करीत असले तरी अद्यापही अनेक जागांवर एकमत होऊ शकलेले नाही. विदर्भातील अमरावती व रामटेक या जागांवर काँग्रेस आणि शिवसेना या दोघांनीही दावा केला आहे. मुंबईतील जागांवरून अद्याप सहमती होऊ शकलेली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीत दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर – पश्चिम मतदारसंघातून गजानन कीर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. महाविकास आघाडीत हे तिन्ही मतदारसंघ मिळाले पाहिजेत, असा ठाकरे गटाचा दावा आहे. खासदार असल्याने जागावाटपात हे तिन्ही मतदारसंघ ठाकरे गटाला मिळणे क्रमप्राप्त आहे. पण ठाकरे गटाकडे निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार आहेत का, असा प्रश्न काँग्रेस नेते उपस्थित करीत आहेत.

हेही वाचा : पूनम महाजन यांची कसोटी 

दक्षिण मुंबई मतदारसंघ मिळणार नाही हे लक्षात येताच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. दक्षिण मध्य मुंबईतून गेल्या वेळी शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले होते. या मतदारसंघावरूनही ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू आहे. ठाकरे गटाकडे ताकदीचा उमेदवार नाही, असा काँग्रेसचा आक्षेप आहे. धारावीवर काँग्रेसची सारी भिस्त आहे. चेंबूर, वडाळा,. धारावीच्या आधारे काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे. उत्तर- पश्चिम मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. कीर्तीकर यांचे वय झाल्याने व प्रकृती साथ देत नसल्याने मुलाला पुढे केले होते. पण मुलगा अमोल यांनी ठाकरे गटातच थांबणे पसंत केले. हा मतदारसंघ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना आपल्या दुसऱया मुलासाठी हवा आहे. यावरून कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यात कलगीतुरा रंगला होता. महाविकास आघाडीत या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे. अमोल कीर्तीकर निवडून येऊ शकत नाहीत, असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. या मतदारसंघातून मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम इच्छूक आहेत. गेल्या वेळी त्यांना या मतदारसंघातून ३ लाख मते मिळाली होती. काँग्रेसने हा मतदारसंघ जागावाटपात प्रतिष्ठेचा केला आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अखिलेश यादवांना आमंत्रण नाही? उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?

उत्तर – मध्य मतदारसंघात माजी खासदार प्रिया दत्त या इच्छूक नाहीत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. या मतदारसंघात काँग्रेसकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही. पण मतदारसंघातील मुस्लीम मतदारांचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसला विजयाची आशा आहे. ईशान्य किंवा उत्तर मुंबई या दोन मतदारसंघाबाबत काँग्रेस फारशी आग्रही नाही. उत्तर पश्चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य हे तीन मतदारसंघ मिळाले पाहिजेत, अशी मुंबईतील काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. काँग्रेसला मुंबईत एक जागा सोडली जाईल, असे विधान संजय राऊत यांनी केल्याने काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत. मिलिंद देवरा यांनी पक्षाला रामराम केला असून, बाबा सिद्दिकी हे पक्ष सोडण्याच्या तयारी आहेत. जागावाटपात काँग्रेस डावलला गेल्यास आणखी काही नेते पक्ष सोडण्याची नेतृत्वाला भीती आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In mumbai conflict between uddhav thackeray s shivsena and congress for seat sharing print politics news css
First published on: 04-02-2024 at 09:40 IST