नंदुरबार – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार खासदार डाॅ. हिना गावित यांच्याभोवती विरोधकांपेक्षा स्वपक्षीय तसेच मित्रपक्षांची नाराजी त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय झाला असून महाविकास आघाडीकडून होणाऱ्या आरोपांपेक्षाही महायुतीअंतर्गत नाराजी दूर करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

पक्षाअंतर्गत आणि मित्रपक्षांकडून मोठा विरोध असतानाही भाजपने तिसऱ्यांदा डाॅ. हिना गावित यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सहा तालुक्यांचा समावेश आहे. नंदुरबार तालुक्यातून भाजपचा मित्रपक्ष असलेला शिंदे गट त्यांना उघडपणे विरोध करत आहे. शिंदे गटाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांचा प्रचार करत आहेत. शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि भाजपचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यातील पारंपरिक वाद आणि त्याकडे राज्यातील सर्वच वरिष्ठांनी केलेला कानाडोळा, यामुळे शिंदे गट आता नाही तर, कधीच नाही, या भूमिकेतून डाॅ. गावित यांच्या पराभवासाठी काम करताना दिसून येत आहे. धडगाव-अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे नेते विजय पराडके हेही तटस्थ भूमिकेत आहेत.

हेही वाचा – केरळमधील ‘व्हायरल’ टीचर अम्मा आहे तरी कोण? काय आहे कम्युनिस्ट पक्षाची रणनीति?

शहादा- तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोंडाईचातील आमदार जयकुमार रावल यांचे मामा जयपालसिंह रावल आणि अभिजीत पाटील यांनी डॉ. गावित यांच्याविरोधात कंबर कसली आहे. त्यांनी तर शहाद्यात सभा घेत डॉ. गावितांविरोधात काम करण्याचे जाहीर केले आहे. नवापूर मतदारसंघातील राजकीय परिस्थिती फारशी वेगळी नाही. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेले जिल्हा परिषद सदस्य भरत गावित शांत आहेत.

जिल्ह्यात शिंदे गटाचा टोकाचा विरोध असताना दुसरा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटही भाजपच्या प्रचारापासून दूरच आहे. विशेष म्हणजे मित्रपक्षांची नाराजी वजा विरोध पाहता भाजपमधील एका गटाचे मोठे पदाधिकारीही अद्याप प्रचारात सक्रिय नाहीत. भाजपच्या नावाने समाज माध्यमातून डॉ. हिना गावित यांच्याविरोधात संदेश टाकण्यात येत असतानाही भाजपकडून त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर दिले जात नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा – काशी, मथुरा व अयोध्येचा मुद्दा काँग्रेसकडून जाणीवपूर्वक प्रलंबित; गिरीराज सिंह यांचा आरोप

महाविकास आघाडीकडून एकिकडे राजकीय आरोप केले जात असताना मित्रपक्ष आणि स्वपक्षीयांची तटस्थता डाॅ. गावित यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यापासून महायुतीच्या घटका पक्षांसोबत समन्वय केला जात आहे. आणि तो पुढेही ठेवला जाईल. २२ तारखेपासून महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करतील आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित होईल. – खासदार. डॉ. हिना गावित (नंदुरबार)