लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: महायुती आणि महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढून देखील अनेक बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. ऐरोली, बेलापूर, कल्याण पूर्व या मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे बंडखोर रिंगणात आहेत. कोपरी पाचपाखाडी येथे काँग्रेस बंडखोरामुळे ठाकरे गटाला नुकसान होऊ शकते. भिवंडी पश्चिम मध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोजक्याच बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले. यात शिवसेनेच्या भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम येथे असलेल्या उमेदवारांसमोरचे बंडखोर थंड झाले. यात भिवंडी पूर्व येथून शिवसेनेने संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली होती. तिथे रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी केली होती. भिवंडी ग्रामीण मतदार संघामध्ये शिवसेनेच्या शांताराम मोरे यांच्यासमोर भाजपच्या ग्रामीण युवती अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे येथे शिवसेनेला फटका बसण्याची भीती आहे. कल्याण पश्चिम येथे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासमोर भाजपच्या नरेंद्र पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र या दोघांनी माघार घेतली. त्याचवेळी कल्याण पश्चिमेकडून कपिल पाटील यांचे निकटवर्तीय वरुण पाटील मात्र निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.

आणखी वाचा- ठाणे: सिगारेट मागितली म्हणून हत्येचा प्रयत्न

कल्याण पूर्व मतदार संघातून सुलभा गणपत गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी बंडखोरी करता पक्ष अर्ज दाखल केला. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने येथे बंडखोरी झाली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली. मात्र शिवसेनेच्या विजय नाहाटा यांनी येथून अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी इथून माघार घेतलेली नाही. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या गणेश नाईक यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या विजय चौगुले यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनीही अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीला आणि विशिष्ट भाजप उमेदवारांना येथे फटका बसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-“माझे संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न”, भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा दावा, दीपेश म्हात्रे यांचे नाव न घेता आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाकरे गटाने केदार दिघे यांना उमेदवारी दिली. मात्र काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी येथून अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसने दयानंद चोरगे यांना उमेदवारी दिली होती. समाजवादी पक्षाच्या रियाज आझमी यांनी येथून अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनीही आपला अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. शहापूर विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने दौलत दरोडा यांना उमेदवारी दिली मात्र महाविकास आघाडीचा घटक असलेल्या ठाकरे गटाच्या वतीने अविनाश शिंगे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. तर मुरबाड विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या शैलेश वडनेर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतलेली नाही.