अलिबाग : कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आता काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा सांगितल्याने, आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

भाजपच्या निरंजन डावखरे यांचा कार्यकाळ संपल्याने, विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सलग दोन वेळा निरंजन डावखरे या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर दुसऱ्यांदा भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. आता तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून ते ही निवडणूक लढविणार आहेत.

हेही वाचा…उमेदवारांची भूमिका : पालघर मतदार संघ, आरोग्यासाठी केलेल्या कामांचा फायदा होईल – भारती कामडी

दरम्यान शिवसेनेनी गेल्या निवडणूकीपासून या मतदारसंघात बांधणी सुरू केली होती. भाजपशी फारकत घेऊन ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांनी गेल्या वेळी निवडणूकही लढवली होती. चांगली मतं मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार निवडणूकीत उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. रायगडचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांना निवडणूकीची तयारी करण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी मतदार नोंदणीवर भर दिला आहे. मात्र आता या मतदारसंघातून काँग्रेसला उमेदवारी मिळावी अशी मागणी समोर आली आहे. रायगड मधून काँग्रेसचे प्रदेश सचिव अँड प्रविण ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. रत्नागिरीतून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी केली असल्याने रमेश कीर हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पक्षाने कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पक्ष समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसने रायगड आणि रत्नागिरी सिंधूदुर्ग मतदारसंघात उमेदवार दिला नव्हता. महायुतीकडून या दोन्ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्या होत्या. या बदल्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरचा दावा शिवसेनेने सोडावा आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.

हेही वाचा…उमेदवारांची भूमिका : ईशान्य मुंबई मतदार संघ, नाहक भाषिक वाद पेटविला जात आहे – मिहिर कोटेचा

काँग्रेसने लोकसभा निवडणूकीत कोकणातील सर्व प्रमुख जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सोडल्या होत्या. त्याबदल्यात कोकण पदवीधर मतदारसघाची जागा काँग्रेसला मिळावी अशी आमची मागणी आहे. तशी बोलणी सुरू आहे – महेंद्र घरत, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

हेही वाचा…मतदारसंघाचा आढावा : दक्षिण मुंबई, शिंदे गटासाठी उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा अडचणीची ठरणार ?

कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी मिळावी अशी मागणी मी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्याकडे केली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास मी ही निवडणूक लढविणार आहे – प्रविण ठाकूर, प्रदेश सचिव काँग्रेस