ओडिशा राज्यामध्ये बिजू जनता दल हा सत्ताधारी पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी तिथे विरोधी पक्षामध्ये आहे. या राज्यामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका समांतरपणे पार पडणार आहेत. गेली वीस वर्षे बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक हेच तिथले मुख्यमंत्री राहिले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये, बिजू जनता दलाने (BJD) पुन्हा एकदा ३३ टक्के महिलांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांनी काल गुरुवारी लेखश्री सामंतसुंघर यांना बालासोरमधून उमेदवारी जाहीर केली.

यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाला, माजी प्रशासकीय अधिकारी आणि नवीन पटनाईक यांचे विश्वासू सहकारी असलेले व्ही. के. पांडियान यांनी महिला कार्यकर्त्यांना असे आश्वासन दिले होते की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष महिलांसाठी एकतृतीयांश जागा राखीव ठेवण्याचा आपला निर्णय कायम ठेवणार आहे.

हेही वाचा : ‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

एकतृतीयांश महिलांना लोकसभेची उमेदवारी

प्रादेशिक पक्ष असलेल्या बिजू जनता दलाने २० लोकसभा जागांसाठी आतापर्यंत सहा महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे. बालासोरमधून लेखश्री सामंतसुंघर यांना उमेदवारी देण्यासोबतच, पक्षाने कोरापूत, असका, जाजपूर, जगतसिंगपूर, भद्रक आणि बारगढमधून महिलांना उमेदवारी दिली आहे; तर दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाने २१ लोकसभा जागांपैकी ४ जागांवर महिलांना उमेदवारी दिली आहे.

बिजू जनता दलाने यापूर्वी २०१९ मध्येही लोकसभा निवडणुकीमध्ये ३३ टक्के जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती. त्यांनी दिलेल्या सात महिला उमेदवारांपैकी पाच उमेदवारांचा विजय झाला होता. २०१८ मध्ये बिजू जनता दलाने २२ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची मोट बांधत ‘महिला आरक्षण विधेयका’चा मार्ग सुकर करण्यासाठी प्रयत्न केले होते. सरतेशेवटी ते २०२३ मध्ये पारित झाले.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे वडील बिजू पटनाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी १९९० सालीच पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिलेले होते. बिजू जनता दल सरकारने २०१२ मध्ये ते वाढवून ५० टक्क्यांपर्यंत नेले.

भाजपा-काँग्रेसमधून बिजू जनता दलामध्ये पक्षांतर

माजी प्राध्यापक असलेल्या लेखश्री सामंतसुंघर यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या ओडिशामधील टीव्हीवर सातत्याने झळकणाऱ्या एक लोकप्रिय चेहरा बनल्या होत्या. कारण त्या पटनाईक सरकारवर जोरदार टीका करायच्या. वेगवेगळ्या विषयांवर बिजू जनता दलाला अडचणीत आणत जहरी टीका करण्यासाठी त्या ओडिशामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. विविध विषयांवर रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी त्या एक होत्या.

७ एप्रिल रोजी त्यांनी ‘X’ वर पोस्ट करत भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेतृत्व काहीही करत नसल्याचा आरोप करत त्यांनी हा राजीनामा दिला. त्या म्हणाल्या की, प्रामाणिकपणे मेहनत करूनही राज्याच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी आणखी काही करता येईल असे मला वाटत नाही, असे म्हणत त्यांनी पक्षाला रामराम केला.

बिजू जनता दलामध्ये प्रवेश केल्यानंतर आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या म्हणाल्या की, “मला बालासोर जागेवरून उमेदवारी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते. मुख्यमंत्र्यांकडे राज्याच्या विकासासाठी एक दृष्टी आहे. राज्य सरकार आणि पक्षाची ध्येयधोरणे पुढे नेण्यासाठी मी माझी १०० टक्के क्षमता वापरेन.”

भारतीय जनता पार्टीमधून बिजू जनता दलामध्ये प्रवेश करणाऱ्या लेखश्री या भृगु बक्षीपत्र यांच्यानंतरच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्या आहेत. बक्षीपत्र यांना बिजू जनदा दलाने बेरहामपूर लोकसभा जागेवरून उमेदवारी दिली आहे. लेखश्री यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्याने बिजू जनता दलामध्ये भाजपा वा काँग्रेसमधून आलेल्या उमेदवारांच्या यादीत आणखी एकाची भर पडली आहे. ही संख्या आता आठवर गेली आहे.

हेही वाचा : मुस्लीम-यादवांच्या पलीकडे जाण्याचा लालूंच्या पक्षाचा प्रयत्न; राष्ट्रीय जनता दलाने कुणाला दिली उमेदवारी?

लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका

लोकसभेसोबतच ओडिशामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. १४७ जागांपैकी ११७ जागांवरील उमेदवारांची यादी बिजू जनता दलाने घोषित केली आहे. पक्षाने जवळपास सगळीकडेच विद्यमान आमदारांनाच उमेदवारी दिली आहे. फक्त एके ठिकाणी विद्यमान आमदाराच्या पत्नीला तिकीट देण्यात आले आहे.

संबलपूर विधानसभा जागेवर बिजू जनता दलाने भाजपाचे नेते जयनारायण मिश्रा यांच्या विरोधात वरिष्ठ नेते प्रसन्न आचार्य यांना उमेदवारी दिली आहे. जयनारायण मिश्रा हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. संबलपूर लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि बिजू जनता दलाचे संघटनात्मक सचिव प्रणब प्रकाश दास यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रसन्न आचार्य यांची विधानसभेची उमेदवारी महत्त्वाची ठरते.

आतापर्यंत घोषित केलेल्या ११७ जागांपैकी २२ जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अर्थातच, महिलांना लोकसभेच्या ३३ टक्के जागांवर उमेदवारी देणार असल्याच्या आश्वासनाहून विधानसभेसाठीच्या या जागा कमी आहेत. २०१९ मध्ये पक्षाने १४७ पैकी १९ जागांवर महिलांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी १२ महिला निवडून आल्या होत्या.