पंजाबमध्ये सर्व १३ लोकसभा मतदारसंघांसाठीचे मतदान सातव्या टप्प्यामध्ये १ जून रोजी पार पडणार आहे. मात्र, मागील सहा लोकसभा निवडणुकांची आकडेवारी काढली असता, पंजाबने आजवर केंद्रातील सत्तेच्या विरोधात जातच मतदान केले असल्याचे लक्षात येते. याला फक्त १९९८ व २००९ च्या निवडणुकीचा अपवाद आहे. २०१४ साली आम आदमी पार्टी हा पक्ष पंजाबमध्ये आपले पाय रोवण्यासाठी प्रयत्न करीत होता; तेव्हाच आप पक्षाचे चार खासदार पंजाबमधून निवडून संसदेत गेले होते. त्यामुळेच आपचा पंजाबमधील वावर वाढला आणि आज पंजाबमध्ये आम आदमी पार्टी सत्तेत आहे. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने ११७ पैकी ९२ जागा जिंकत सत्ता काबीज केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९९८ ची लोकसभा निवडणूक

१९९८ साली पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल व भाजपा यांची सत्ता होती. १९९६ साली या दोन्ही पक्षांनी युती केली होती आणि त्यापुढील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आले होते. त्यांनी एकत्रितपणे ९५ जागांवर विजय मिळविला होता. १९९८ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबने केंद्रातील सत्तेबरोबर जाणे पसंत केले. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाच्या युतीला १३ पैकी ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये घवघवीत यश मिळाले. त्यापैकी तीन जागा भाजपाच्या होत्या. उर्वरित दोन खासदारांमध्ये माजी पंतप्रधान आय. के. गुजराल (जनता दल) व सतनाम सिंग कैंथ (अपक्ष) यांचा समावेश होता.

हेही वाचा : निवडणुकीच्या सहा टप्प्यांमध्ये किती घसरला आहे मतदानाचा टक्का?

१९९८ च्या त्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील ५४३ पैकी १८२ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. इतर मित्रपक्षांचा पाठिंबा मिळवीत अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, अवघ्या काही दिवसांतच एआयडीएमकेच्या (१८ खासदार) जयललिता यांनी एनडीए आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याने वाजपेयी सरकार कोसळले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे सुपुत्र सुखबीर सिंग यांनी या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. फरीदकोट मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर वाजयेपी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले होते.

१९९९ ची लोकसभा निवडणूक

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र एनडीए सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपाला पुन्हा एकदा १८२ जागा मिळाल्या. वाजपेयी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पहिल्यांदा पूर्ण केला. मात्र, पंजाबमध्ये एनडीए आघाडीची वाताहत झाली. शिरोमणी अकाली दल आणि भाजपाच्या युतीने एकत्रितपणे फक्त तीन जागा जिंकल्या. विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात त्यांचेच सरकार होते. १९९८ साली काँग्रेसला पंजाबमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, १९९९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाने एक (अमृतसर मतदारसंघ); तर भाकपने एक जागा जिंकली. सुखबीर सिंग बादल यांचा फरीदकोट मतदारसंघात झालेला पराभव चर्चेचे सर्वांत मोठे कारण ठरला.

२००४ ची लोकसभा निवडणूक

भाजपाला २००४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याविषयी खूपच मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास होता. तत्कालीन पंतप्रधान वाजपेयींनी सहा महिने आधीच लोकसभा बरखास्त केली आणि निवडणुकीला सामोरे जाणे पसंत केले. या निवडणुकीमध्ये भाजपाने ‘इंडिया शायनिंग’चा नारा देत प्रचार केला. मात्र, भाजपाचा अतिआत्मविश्वास प्रत्यक्षात त्यांचा पराभव करणारा ठरला. २००४ साली काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकारने मनमोहन सिंग यांच्या डोक्यावर पंतप्रधानपदाचा मुकुट चढवीत, सत्ता स्थापन केली.

मात्र, या निवडणुकीतही पंजाबमधील निकाल केंद्रातील सत्तेला अनुकूल ठरणारे नव्हते. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या होत्या; तर शिरोमणी अकाली दल (८) व भाजपाने (३) अशा एकत्रितपणे ११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती.

२००९ ची लोकसभा निवडणूक

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने २००९ ची लोकसभा निवडणूक पुन्हा जिंकली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला २०६ जागा मिळाल्या होत्या. बसपा, जेडीएस व राजद यांच्या पाठिंब्यासह यूपीए सरकारने सत्ता स्थापन केली. त्यावेळी पंजाबमध्ये प्रकाशसिंग बादल यांच्या नेतृत्वाखील शिरोमणी अकाली दलाची सत्ता होती. तरीही काँग्रेसला पंजाबमध्ये आठच जागा मिळविता आल्या. पंतप्रधानपदी असणारा शीख व्यक्तीचा चेहरा काँग्रेसच्या पथ्यावर पडला. या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला चार; तर भाजपाला फक्त एकच जागा मिळाली.

हेही वाचा : ‘या’ काँग्रेस नेत्याची पोस्टल बॅलेटद्वारे मतदनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने नाकारली; काय आहेत कारणं?

२०१४ ची लोकसभा निवडणूक

या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने एकहाती सत्ता प्राप्त केली. २८२ मतदारसंघांमध्ये विजय मिळवीत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काँग्रेसने या निवडणुकीत फक्त ४४ जागा जिंकत आतापर्यंतची सर्वांत खराब कामगिरी नोंदवली. पंजाबमध्ये २०१२ साली शिरोमणी अकाली दल आणि भाजपाने सत्ता स्थापन केली होती.

मात्र, या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने बाजी मारली होती. संगरूर, फरीदकोट, फतेहगढ साहिब व पटियाला या चार मतदारसंघांमध्ये आपचे उमेदवार विजयी ठरले. त्यावेळी भगवंत मान (पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री) संगरूर मतदारसंघातून निवडून आले; तर धरमवीर गांधी (तेव्हा आपमध्ये होते) यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी प्रणीत कौर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला तीन; तर शिरोमणी अकाली दल व भाजपाला प्रत्येकी चार जागा मिळाल्या.

२०१९ ची लोकसभा निवडणूक

या निवडणुकीमध्ये भाजपाने प्रचंड बहुमताने केंद्रात सत्ता स्थापन केली. एकट्या भाजपाला ३०३ जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पंजाबमध्ये केवळ आठ जागा जिंकू शकला; तर शिरोमणी अकाली दलाने १० जागा लढवून दोनच जागा जिंकल्या. भाजपाने तीन जागा लढवून दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीत आपलाही फारसे यश मिळाले नाही. फक्त भगवंत मान यांनाच विजय मिळविता आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha election punjab mostly gone against centre history vsh
First published on: 29-05-2024 at 17:00 IST