इंदिरा गांधींनी आपली राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणीबाणी लादली तेव्हा खरे तर देशाच्या घटनेचा आत्मा नष्ट झाला होता, असा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केला आहे. भाजपाला घटना बदलण्यासाठीच ‘चारशेपार’ जायचे असल्याचा विरोधकांचा दावा फोल असून पंतप्रधान मोदींनीच गेल्या दहा वर्षांपासून घटनेच्या मूलभूत चौकटीचे रक्षण केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली आहेत.

डिसेंबर २०२३ मध्ये मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, या निवडणुकीनंतर भाजपाकडून शिवराज सिंह चौहान यांच्याऐवजी मोहन यादव यांना आश्चर्यकारकपणे मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आले. भाजपाच्या या निर्णयावर बरीच चर्चाही झाली होती. मोहन यादव हे उज्जैनमधून तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी राज्यातील लोकसभेचे सर्व २९ मतदारसंघ जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.

हेही वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मगावी संविधानाच्या मुद्यावरून राजकारण केल्याबद्दल दलितांमध्ये नाराजी, मुस्लिमही भीतीच्या छायेत

“सर्व मतदारसंघांमध्ये विजयी होऊ”

मध्य प्रदेशमध्ये २९ पैकी किती जागा जिंकण्याबाबत तुम्हाला आत्मविश्वास आहे, असे विचारले असता मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, ” ‘प्राण जाए पर वचन ना जाए’ हे भाजपाचे ब्रीद आहे. म्हणूनच, लोक मोदींची गॅरंटी म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ मानतात. पंतप्रधान मोदींनी राम मंदिरापासून ते कलम ३७० पर्यंत, सगळी वचने पूर्ण करून दाखवली आहेत. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व २९ मतदारसंघात नक्कीच विजयी होऊ, असा आत्मविश्वास आम्हाला आहे.”

“काँग्रेस पक्ष म्हणजे घराणेशाहीशिवाय दुसरे काहीही नाही”

गेल्या काही महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमधील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाला विजयाबाबत इतका आत्मविश्वास असतानाही काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात का सामील करून घेतले, असे विचारता ते म्हणाले की, “देशाच्या विकासासाठी नव्हे तर एका कुटुंबाच्या विकासासाठी त्यांचा पक्ष काम करत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांना हळूहळू लक्षात येत आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे घराणेशाहीशिवाय दुसरे काहीही नाही. दुसऱ्या बाजूला, कार्यकर्त्यांची कौटुंबिक अथवा राजकीय पार्श्वभूमी काय आहे, हे न पाहता भाजपा प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देत आला आहे.” माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “कमलनाथ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी माजी मंत्री इमरतीदेवींबद्दल केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते की, ते कोणत्या मूल्यांवर विश्वास ठेवतात. स्त्रियांचा अपमान करणे ही त्यांची संस्कृती आहे. पक्षाला कोणताही नवा दृष्टिकोन आणि मूल्ये नसल्याचे आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करू न शकणाऱ्या पक्षामध्ये आता कुणीही राहू इच्छित नाही. भाजपा त्यांना संधी देऊ शकतो, असे त्यांना वाटत असेल तर आम्ही खुल्या दिलाने त्यांचे स्वागत करतो”, असेही ते म्हणाले.

संविधान बदलण्यासाठी ‘चारशेपार’ची घोषणा?

सत्ताधारी पक्षाला संविधान बदलायचे असल्याने ‘चारशेपार’ची घोषणा दिल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “ज्या पक्षाने आपल्या कार्यकाळात केवळ संविधानाचा अवमान केला आहे, अशा पक्षाकडून अशी विधाने केली जात आहेत ही गमतीची गोष्ट आहे. आपली राजकीय सत्ता टिकवून ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, तेव्हा याच घटनेचा आत्मा नष्ट करण्यात आला होता. आशीर्वाद घेण्यासाठीही राम मंदिरात न गेलेले काँग्रेस नेते आता संविधानाबद्दल बोलत आहेत. त्यांच्याकडे कशावरही बोलण्यासाठी नैतिकता उरलेली नाही. पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांपासून घटनेच्या मूलभूत चौकटीचे रक्षण केले आहे”, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा : केजरीवालांच्या ‘पंचाहत्तरी’च्या यॉर्करमुळे भाजपची दाणादाण

“लोकांची संपत्ती हिसकावून घेणे हे काँग्रेसचे ध्येय”

संपत्तीचे फेरवाटप आणि वारसा कराबाबत बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसने लोकांची संपत्ती हिसकावून घेऊन ती घुसखोरांमध्ये वाटण्याचा कट रचला आहे. म्हणूनच ते नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत आहेत आणि संपत्तीच्या फेरवाटपाबद्दल बोलत आहेत, हा आणखी एक मोठा घोटाळा आहे.”

काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तो ओबीसी कोट्यातून मुस्लिमांना आरक्षण देईल, असा आरोप भाजपाने केला आहे. याबद्दल ते म्हणाले की, “काँग्रेसने आजवर खोटे बोलणे आणि देशाची फसवणूक करण्याशिवाय दुसरे काहीही केलेले नाही. पंतप्रधान मोदींनी गेल्या १० वर्षांत आरक्षण संपवले नाही. त्यांनी वंचित घटकांना सामाजिक न्याय आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी कुणीही घेतले नसतील एवढे कष्ट घेतले आहेत. सध्याची आरक्षणाची व्यवस्था ही धर्मावर आधारित नसून सामाजिक आणि आर्थिक निकषांवर आधारित आहे.

शिवराज सिंह चौहान यांच्याऐवजी तुम्हाला मुख्यमंत्रिपद देणे आश्चर्यकारक होते का, या प्रश्नावर ते म्हणाले की, “विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माझ्या नावाची घोषणा झाली तेव्हा माझा माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता; पण आमच्या पक्षाची नीति अनोखी आहे, कारण ती प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमचा पक्ष एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम करतो. आजही शिवराज सिंह चौहान मला मदत करतात”, असेही ते म्हणाले.