Lok Sabha Election 2024 लोकसभा निवडणुकीच्या काळात सध्या सर्वत्र चर्चा आहे ती संविधान बदलाची आणि आरक्षणाची. मध्य प्रदेशातील डॉक्टर आंबेडकर नगर शहरात आणि आजूबाजूच्या परिसरातदेखील संविधान बदलाविषयी भीतीची भावना पसरली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थान असलेल्या आंबेडकर नगरमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या १३ टक्के आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित होण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाने या गावात तीन वर्षे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील डॉक्टर आंबेडकर नगर शहराला पूर्वी महू म्हणून ओळखले जायचे. या गावातील राजेंद्र नगरच्या झोपडपट्टीत एक विहार आहे; जिथे गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निळ्या स्तंभांवर बसविलेले अर्धाकृती पुतळे आहेत. हे पुतळे म्हणजे दलित समाजासाठी देवस्थानच आहे. या नागरिकांसाठी डॉक्टर आंबेडकरच त्यांचे आदर्श आहेत.

हेही वाचा : “प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार”; शरद पवार असे का म्हणाले? खरंच हे शक्य आहे का?

भाजपा आणि काँग्रेस करीत असलेले राजकारण धोकादायक

विहाराच्या आत बसलेली १८ वर्षीय दिव्या वाहुरवाघ हिच्या म्हणण्यानुसार बाबासाहेबांप्रमाणे तिला वकील होण्याची इच्छा आहे. एलएलबी अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी ती प्रयत्न करीत आहे. “डॉ. आंबेडकरांचा जन्म माझ्या गावात झाला. त्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले. मलाही राजेंद्र नगर सोडायचे आहे. आजपर्यंत माझ्या कुटुंबातील कोणीही ही झोपडपट्टी सोडू शकलेले नाही,” असे दिव्या म्हणाली. संविधान बदलाच्या राजकारणावरही तिने आपले मत व्यक्त केले. ती म्हणाली की, भाजपा आणि काँग्रेस करीत असलेले राजकारण धोकादायक आहे. “आंबेडकरांच्या नावावर लोक राजकारण करीत आहेत, हे खेदजनक आहे. अर्थात राज्यघटना बदलली जाणार नाही आणि मुस्लिमांना आरक्षण दिले जाणार नाही,” असे मत तिने व्यक्त केले.

इंदूरपासून २४ किमी अंतरावर असलेल्या धार लोकसभा मतदारसंघाचा आंबेडकर नगर एक भाग आहे; जिथे १३ मे रोजी मतदान होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते काँग्रेस खासदार राहुल गांधींपर्यंतच्या राजकारण्यांमुळे या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या सुरू असलेल्या संविधानाच्या चर्चेत राहुल गांधी यांनी भाजपाला संविधान फाडून फेकून द्यायचे असल्याचा आरोप केला आहे; तर काँग्रेसला ओबीसींचे आरक्षण लुटून मुस्लिमांना द्यायचे आहे, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे.

दोन्ही पक्षांविरुद्ध दलितांमध्ये नाराजी

लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. आरक्षणाविषयीही अनेक दावे केले जात आहेत. त्यामुळे या परिसरात असुरक्षिततेचे वातावरण पाहायला मिळत आहे. संविधानावर राजकारण केल्याबद्दल दोन्ही पक्षांविरुद्ध दलितांमध्ये नाराजी आहे. या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जिथे घर होते, तिथे आज पांढरे संगमरवरी आणि सोनेरी आंबेडकरांचा पुतळा असलेला प्रशस्त हॉल आहे. या जागेला भीम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. परंतु, भीम जन्मभूमी चालविणाऱ्या प्रभारींनीही एकमेकांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत.

बी.टेक. ग्रॅज्युएट असलेले सुखदेव डाबर म्हणतात, “दोन्ही पक्ष सर्वांत मोठे आंबेडकरभक्त असल्याचा दावा करतात आणि त्यांना संविधान वाचवायचे आहे. येथे समितीचे सदस्य एकमेकांवर पैसे चोरल्याचा आरोप करीत आहेत. हे वास्तव आहे. प्रत्येक जण भाषणे करतो आणि बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतो.”

मुस्लीम समुदायही भीतीच्या छायेत

आंबेडकर नगरपासून ५० किमी अंतरावर भोजशाला मंदिर आणि कमल मौला मस्जिद संकुल आहे. या परिसरात मुस्लीम समुदायाची संख्या लक्षणीय आहे. परिसरातील मुस्लिमांमध्येही चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. आरक्षणाच्या वादात त्यांची नकारात्मक प्रतिमा रंगवली गेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मध्य प्रदेशमध्ये मुस्लिमांचे प्रमाण अल्प असले तरी ते धारच्या लोकसंख्येच्या १६ टक्के आहे.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पथक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भोजशाळा-कमल मौला संकुलात उत्खनन करीत आहे. या परिसरातील रहिवासी नीलेश कुमार म्हणतात, “आता सगळे हिंदू-मुस्लिमांवर अवलंबून आहेत. चहा विकत फिरणारे अभियंते, विक्रम मोडणाऱ्या डाळीच्या किमती यांबद्दल कुणी विचारायचे नाही. काँग्रेसने येथे जागा जिंकल्यानंतर भोजशाळा आणि आरक्षणाचे मुद्दे पुढे आले आहेत,” असे ते म्हणाले.

गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने धार लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला असून, यंदाही विद्यमान खासदार सावित्री ठाकूर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना काँग्रेसचे आदिवासी नेते राधेश्याम मुवेल यांच्याशी होणार आहे. धारमधील आठ विधानसभा जागांपैकी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पाच जागा जिंकल्या होत्या.

हेही वाचा : इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

इस्लामपुरा गावातील रहिवासी शाहरुख सोनी म्हणतात की, या निवडणुकीच्या काळात हिंदू आणि मुस्लिमांमधील अंतर वाढले आहे. “हिंदू आणि मुस्लिम कट्टर झाले आहेत. आपण कोणाचे हक्क हिरावून घेऊ शकतो का? आम्ही कोणाची व्होट बँक नाही; आम्ही माणसं आहोत. आपण पाकिस्तानसारखे वागू नये,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dalits and muslims on constitution in madhya pradesh rac