देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. सात टप्प्यांत होणार्‍या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान १९ एप्रिलला पार पडले. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरली. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातील राजकरणाचे चित्र बदलले आहे. त्यावरून कुठे न कुठे लोकांच्या मनात संभ्रम असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला हरविण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडल्या, एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे पक्ष एकत्र आले, इंडिया आघाडी गट स्थापन झाला, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे दोन भाग झाले, राज ठाकरेंनी मोदींना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला, तर वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीबरोबर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कट्टर विरोधक एकत्र

भारत जोडो न्याय यात्रेची १७ मार्च रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क येथील सभेत सांगता झाली, तेव्हा या सभेदरम्यान प्रामुख्याने दोन गोष्टी दिसून आल्या. राहुल गांधी यांनी उद्यानाच्या आवारातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केले, तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीपेक्षा वेगळी केली. “माझ्या हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो…” असे म्हणण्याऐवजी त्यांनी “माझ्या देशभक्त बंधू, भगिनी, माता…” म्हटले. सहा दशकांपासून राज्याच्या धर्मनिरपेक्ष विरुद्ध जातीय विभाजनात एकमेकांचा तिरस्कार करणारे पारंपरिक प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि सेना एकत्र आल्यानंतर हा बदल दिसला.

हेही वाचा : “अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली. पक्षांतर्गत वाद, केंद्रीय संस्थांच्या राजकीय नेत्यांवर कारवाया, बंड, पक्षांचे विभाजन यांसारख्या अनेक गोष्टी घडल्या. त्यानंतर राज्यात तयार झालेल्या दोन नवीन आघाड्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. एका बाजूने भाजपा, शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी तर दुसर्‍या बाजूने काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे जणू चित्रच बदलले. याचा मतदारांच्या मानसिकतेवरदेखील परिणाम झाला.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने कोकण आणि उत्तर महाराष्ट्र पट्ट्यातील मतदारसंघांचा प्रवास केला. या मतदारसंघांमध्ये पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. या सर्व जागा २०१९ मध्ये भाजपा- सेना युतीने जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपा- सेना युतीने ५१.३४ टक्क्यांसह महाराष्ट्रातील ४८ पैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. या मतदारसंघातील नागरिकांना यंदाच्या निवडणुकीविषयी काय वाटतं? यंदा कोण विजयी होणार? त्यांच्या भावना काय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रवासादरम्यान करण्यात आला.

मोदींना पर्याय कोण?

या संपूर्ण प्रवासात पंतप्रधान मोदींना पर्याय कोण? याबद्दल मतदार साशंक दिसले. मोफत रेशनपासून ते एका मोठ्या अंतराळ मोहिमेपर्यंत सर्वत्र पंतप्रधान मोदींच्या योजनांचे आणि आश्वासनाचे होर्डिंग्ज दिसतात, मात्र इतर राजकारणी किंवा पक्षांचे साधे पोस्टर्सही नसल्याच्या लोकांच्या भावना आहेत. पंतप्रधान मोदींनी २०१४ आणि २०१९ मध्ये अनेकांना बदलाची आशा दिली, पण मोदींशिवाय पर्याय कोण? असा प्रश्न आजही महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे.

संविधान बदलाची भीती

अनेक मतदारांमध्ये असंतोषाची भावनाही दिसून आली. वाढत्या किमतींबद्दल आणि विशेषत: कांदा शेतकरी ग्राहक केंद्रित धोरणामुळे घेतल्या जाणार्‍या टोलवर स्पष्टपणे बोलताना दिसले. दलित समुदायामध्ये संविधान बदलाची भीती असल्याचेही पाहायला मिळाले. नाशिक शहरातील मल्हारखान येथील बहुतांश घरांवर वंचित बहुजन आघाडीचे निळे झेंडे फडकत असणार्‍या दलित वस्तीतील शेतकरी दामोदर अण्णा पगारे म्हणाले, “ मोदींची हमी खोटी आहे, गॅस सिलिंडरची किंमत बघा, ते देत असलेले मोफत अन्नधान्यही निकृष्ट दर्जाचे आहे.” पुढे ते म्हणाले, “या निवडणुकीत आम्ही संविधानाचे रक्षण करणाऱ्याला मतदान करू.” जर राज्यघटना बदलली तर दलितांना खटल्यात अडकवले जाईल आणि त्यांना जामीन मिळणार नाही, आरक्षण कमी होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ठाणे-नाशिक महामार्गालगतच्या पडघा गावातील अनुसूचित जातीच्या एका वस्तीत राहणार्‍या गृहिणी रेश्मा दुंडे या शाळेच्या वाढत्या फी, महागाई आणि संविधानाबद्दल बोलल्या. त्या म्हणाल्या, “संविधान बदलले तर आमचे काय होईल?”.

पण, भाजपाच्या सदस्या अश्विनी अशोक काशीवाले यांनी त्यांच्या समाजातील इतरांनी व्यक्त केलेली चिंता चुकीची असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, “ही एक अफवा आहे. माझे लोक भाजपाबरोबर आहेत. माझ्या गावात एक नवीन बुद्ध विहार आहे, चांगला रस्ता आहे आणि जिल्हा परिषद शाळाही आहे…”

मोदी सरकारच्या योजनांचा सर्वांना फायदा

नाशिकच्या केटीएचएम कॉलेजच्या बाहेर उभ्या असणार्‍या विद्यार्थ्यांच्या एका गटातील विद्यार्थिनी सिया चंद्रशेखर झारे मोदी सरकारच्या योजनांबद्दल बोलली. या योजनांचा सर्वांना फायदा होत आहे. जी-२० मध्ये मोदी इतरांच्या पुढे होते, असे मत तिने व्यक्त केले. त्याच गटातील इतर विद्यार्थी समस्यांबद्दल बोलले. “आम्हाला शिक्षण पद्धतीत बदल हवा आहे. येथील शिक्षण कमी दर्जाचे आहे”, असे हर्षदा बारकू म्हणाली. “मोदींची दृष्टी स्पष्ट आहे, आम्हाला इतरांबद्दल माहिती नाही. विरोधी आघाडीचे अनेक अजेंडे आहेत आणि जर त्यांना सत्ता मिळाली तर ते फक्त स्वतःला सांभाळण्यातच वेळ घालवतील”, असे आकाश बैरागी म्हणाला.

कोण राहुल गांधी?

बरेच जण म्हणाले, आम्हाला राहुल गांधींबद्दल माहिती नाही. ते स्वतःचे चांगले मार्केटिंग करत नाहीत, ते सशक्त नाहीत. इतरांचे म्हणणे आहे की, त्यांना गांभीर्याने घेतले जाऊ शकत नाही. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांची लोकप्रियता नक्कीच वाढली आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला. परंतु, आजही लोक मोदींच्या जागी त्यांना निवडून देण्यात साशंक दिसतात. सुमित फोप्से ईडी-सीबीआयच्या सुरू असलेल्या आरोपांवर म्हणतो की, भाजपा आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करत आहे, लोकांना त्रास देत नाही.”

आयेगी तो बीजेपी ही…

पिंपळगावमध्ये कांद्यांच्या बाजारपेठेतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या एका गटाची फळांच्या स्टॉलवर निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू होती. निवडणुकीत एकमेव मोदीच उभे असल्याने त्यांनाच मतदान करायचे असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांसाठी संकट केवळ आसमानी नसून सुलतानी (सरकारकडून) देखील आहे, असे ते म्हणाले. शेतकरी केवळ अवकाळी पावसाचाच नाही तर वाढत्या उत्पादन खर्चाचा, अनियंत्रित निर्यात बंदी आणि वाढलेल्या पिकांच्या किमतीचा बळी ठरला आहे. तरीही प्रमोद गायकवाड म्हणतात, “आयेगी तो बीजेपी ही (येणार तर भाजपाच). पर्याय नहीं है, उनको बैठा दिया (पर्याय नाही). विरोधी पक्षातील सर्व बलाढ्य नेते भाजपामध्ये गेले आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. बाळासाहेब वाघ म्हणाले, “मोदी ठीक है, मगर भाव चाहिये (मोदी ठीक आहेत, पण शेतकऱ्यांना चांगला भाव हवा आहे). दुसरा आदमी चलेगा, पर दुसरा आदमी है ही नही (दुसरा पर्याय चालेल, पण पर्याय नाही)”.

हेही वाचा : उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन

मालेगावमध्ये भाजपाच्या विरोधातील अल्पसंख्याक वर्ग उद्धव ठाकरेंकडे वळण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षाने एकेकाळी मुस्लीम विरोधी भूमिका घेतली होती. परंतु, आता काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर युती केल्यामुळे ते धोरणात्मकदृष्ट्या स्वतःला पुन्हा तयार करत आहेत. वेल्डर शेख अशफाक सांगतात, “करोना लॉकडाऊनदरम्यान उद्धव यांनी मुख्यमंत्री म्हणून सर्वांना मदत केली… ही वेळ वेगळी आहे.” अनेकांच्या मतांवरून असे लक्षात येते की त्यांना पर्याय हवा आहे, परंतु, त्यांच्यानुसार सक्षम पर्यायच नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra voters on maharashtra loksabha bjp modi rac