ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सक्रिय झाले असले तरी या दोन पक्षांच्या एकत्रित मनोमिलन मेळाव्याला मात्र अजूनही मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र आहे. नवी मुंबईत नाईक आणि शिंदेसेनेत विस्तवही जात नाही. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या मिरवणुकीत सहभागी होणारे नाईक कुटुंबीय शिंदेसेनेच्या शाखांकडे मात्र ढुंकूनही पहात नाहीत. अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा एकत्रित मेळावा घेण्याच्या शिंदेसेनेच्या प्रयत्नांना अजूनही यश येत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, नरेश म्हस्के यांच्यासाठी भाजप माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा स्वतंत्र मेळावा शनिवारी आयोजित केला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे लोकसभेची जागा शिंदेसेनेला सुटल्याने नवी मुंबईत नाईक समर्थकांमधील नाराजी उफाळून आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर ही नाराजी दुर झाल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात असला तरी वस्तुस्थिती तशी नाही असे सुत्रांचे म्हणणे आहे. फडणवीस यांच्या नाईक भेटीनंतर नवी मुंबईतील नाराजी नाट्याला विराम मिळताच महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी बेलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांसमवेत संपूर्ण नाईक कुटुंब प्रचार रथावर आरुढ झाले खरे मात्र शिंदेसेनेच्या स्थानिक नेते आणि नाईकांमधील दुरावा अगदी स्पष्टपणे जाणवत होता. नाईक रथावर चढणार हे ठरताच शिंदेसेनेच्या नेत्यांनी ठरवून पडती भूमिका घेतली. पक्षाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले प्रचार रथाकडे फिरकलेच नाही. शिंदेसेनेचे दुसरे नेते विजय नहाटा यांनीही नाईकांपासून दूर रहाण्याचा पर्याय निवडला. गणेश नाईक प्रचारात सहभागी झाल्याने त्यांचे समर्थक माजी नगरसेवक, पदाधिकारी वेगवेगळ्या उपनगरात मिरवणुकीत दिसले. मात्र त्याच्यात उत्साहाचा अभावच होता. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जागोजागी जय्यत तयारी केली होती. यावेळी मुख्यमंत्री स्वत: पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी देत होते. नाईक कुटुंबियांनी मात्र शिंदेसेनेच्या कार्यालयात जाणे टाळले. त्यामुळे नाईक प्रचारात उतरले असले तरी या दोन पक्षांतील स्थानिक पातळीवर दुरावा मिटल्याचे अगदी स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा – ‘मोकळ्या’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!

संयुक्त मेळावा कागदावरच

नवी मुंबईत भाजप आणि शिंदेसेनेचा संयुक्त मेळावा आयोजित करण्याची जोरदार तयारी सध्या ठाण्याहून सुरु आहे. दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक एकत्रितपणे या मेळाव्यात जमतील असे नियोजन करण्यात आले होते. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु होण्यापूर्वीच हा मेळावा उरकून घ्यावा असे शिंदेसेनेचे प्रयत्न होते. भाजपमधील नाईकांच्या गोटातून मात्र अशा संयुक्त मेळावा आयोजित करण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने शिंदेसेनेने सध्यातरी मनोमिलनाचा हा प्रयत्न सोडून दिल्याचे सांगितले जाते. म्हस्के यांच्यासाठी भाजपकडून नवी मुंबईत स्वतंत्र यंत्रणा जोमाने राबवली जाईल. मात्र एकत्रितपणे मेळावे अथवा प्रचार मिरवणुका काढण्याचा आग्रह धरु नका, असा संदेश नाईक यांच्या गोटातून शिंदेसेनेतील ठाण्याच्या नेत्यांपर्यत पोहोचविण्यात आल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.

हेही वाचा – ‘मोकळ्या’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!

म्हस्के यांच्या प्रचारासाठी भाजपने शनिवारी वाशीत एका मेळाव्याचे आयोजन केले असून हा संयुक्त मेळावा नसेल, अशी माहिती सुत्रांनी दिली. भाजपमधील नाईक गटाच्या या भूमिकेस सध्या तरी शिंदेसेनेकडून अनुकूलता दर्शविण्यात आली असून दोन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे, मिरवणुका घेण्याचा आग्रह गुंडाळण्यात आल्याचे सांगितले जाते. यासंबंधी शिंदेसेनेतील एका वरिष्ठ नेत्याकडे विचारणा केली असता ‘गणेश नाईक यांची यंत्रणा म्हस्के यांच्या प्रचारात सक्रिय असली तरी स्थानिक पातळीवरील मतभेद पूर्णपणे मिटले आहेत असे म्हणता येणार नाही’, असे त्याने सांगितले. ‘भाजपकडून नवी मुंबईत म्हस्के यांच्या प्रचारासाठी स्वतंत्र्य मेळावे आयोजित केले जात आहेत, असे एका नाईक समर्थक नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे, असेही या नेत्याने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meeting of ganesh naik shinde sena did not get time print politics news ssb