देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत असून देशभरात मोदींचा प्रभाव घटतो आहे, असा दावा काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. “जसजसे मतदानाचे टप्पे पार पडतील, तसतसे मोदींसमोरचे आव्हान अधिकच वाढत चालले आहे. त्यांच्यासाठी यंदाची निवडणूक अजिबात सोपी नसेल. विरोधकांनी उभ्या केलेल्या आव्हानासमोर मोदींनी आधीच गुडघे टेकलेले आहेत”, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक विषयांवर आपली सडेतोड मते मांडली आहेत. त्यांनी ममता बॅनर्जींवरही कठोर टीका केली असून त्यांच्या हिंसाचाराच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष अस्तित्वासाठी लढाई देत असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. असे असले तरी ममता बॅनर्जी सरकारविरोधात राज्यात रोष असून या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी केलेली युती नक्कीच प्रभावी ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी १९९९ पासून पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. अधीर रंजन चौधरी विद्यमान लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते होते. त्यांच्याविरोधात बहरामपूर मतदारसंघामध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाने माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना, तर भाजपाने डॉ. निर्मल साहा यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती आहे. बहारमपूरमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी तर मुर्शीदाबाद मतदारसंघामध्ये माकपचे राज्य सचिव एम. डी. सलीम रिंगणात आहेत. मुर्शीदाबाद जिल्ह्यामधील या दोन्ही मतदारसंघामधील निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. येत्या १३ मे रोजी चौथ्या टप्प्यामध्ये या मतदारसंघांचे मतदान पार पडणार आहे.

हेही वाचा : रायबरेलीत प्रचार करताना प्रियांका गांधी का काढत आहेत १९२१ च्या हत्याकांडाची आठवण?

“मोदींनी विरोधकांसमोर टेकले गुडघे”

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर एकूण देशाच्या राजकीय परिस्थितीबाबतचे मत विचारले असता अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. देशभरात मोदींचा प्रभाव घटतो आहे, हे दिसून येत आहे. मतदानाचे टप्पे पार पडत आहेत, तसे मोदींसमोरचे आव्हान अधिकच वाढत चालले आहे. यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी अजिबात सोपी नसेल.” पुढे ते म्हणाले की, “विरोधकांनी उभ्या केलेल्या आव्हानासमोर मोदींनी आधीच गुडघे टेकलेले आहेत. त्यामुळे पुढे काय घडणार आहे, ते कुणीही सांगू शकत नाही. आता पुलवामासारखी घटना नाही, अतिरेकी राष्ट्रवाद नाही, बालाकोटनंतर लोकांची जी मानसिकता झाली होती तशीही सध्या नाही. राम मंदिर उद्घाटनामुळे फायदा होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्ष जमिनीवर तसे काहीच चित्र दिसत नाही. अगदी हिंदी भाषक पट्ट्यामध्येही या मुद्द्याचा प्रभाव ओसरलेला आहे. थोडक्यात, संपूर्ण भारतामधील मोदींचा प्रभाव आणि अतिरेक राष्ट्रवादाची भावना कमी-कमी होत चालली आहे. मी काही सेफोलॉजिस्ट (निवडणूकशास्त्र अभ्यासक) नाही; पण मोदीजी नेहमीसारखे निर्धास्त नाहीत, हे सहज दिसून येते आहे” असे ते म्हणाले.

इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी बाहेर का पडल्या?

पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी न होण्यासाठी ममता आणि अभिषेक बॅनर्जींनी तुम्हालाच दोषी ठरवण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “बंगालमध्ये काँग्रेसचा नाश व्हावा म्हणून ममता बॅनर्जी हिंसाचाराचे राजकारण करतात, मी अशा राजकारणाशी लढा देतो आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्ही इथे अस्तित्वासाठी झगडा देत आहोत. बंगालमध्ये माझा पक्ष टिकवून ठेवण्यासाठी मला त्यांच्या विरोधात संघर्ष करावा लागला आहे. मी माझी भूमिका बदललेली नाही.” पुढे त्यांनी ममता बॅनर्जी यांना प्रश्न केला की, “त्यांना कशामुळे इंडिया आघाडीतून बाहेर पडावे वाटले? ‘इंडिया आघाडी’ हे नावदेखील आपणच सुचवले असल्याचा दावा त्या करत होत्या. जर अधीर रंजन चौधरी हाच अडथळा असेल तर त्यांनी आघाडीत सामील होण्याबाबत आधी सहमती का दर्शवली? माझी भूमिका स्पष्ट आहे. मी ममता बॅनर्जींविरोधात लढा देत आहे. पण, आता स्वत:ची लाज वाचवण्यासाठी त्या माझ्यावर आरोप करत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस आणि डाव्यांच्या युतीमुळे निकाल धक्कादायक

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांबरोबर सुरू असलेल्या प्रचारावर ते म्हणाले की, “काँग्रेस किंवा डाव्यांनी कधीही जातीय किंवा सांप्रदायिक राजकारण केले नाही. या मुद्द्यांबाबत आमच्यात कधीही मूलभूत वैचारिक मतभेद नव्हते. काँग्रेसच्या विचारसरणीमध्येही डावे विचार अस्तित्वात आहेत आणि दोघांनी एकत्र येण्याचे इतिहासात अनेक दाखले उपलब्ध आहेत. बंगालमध्ये आमची युती व्हावी, अशीच परिस्थिती होती. आतापर्यंत ही युती चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. या युतीमुळे नक्कीच धक्कादायक निकाल तुमच्या हाती येतील”, असा दावाही त्यांनी केला.

“माकपने पोसलेले गुंड आता ममता बॅनर्जींचे जावई”

पश्चिम बंगालमधील काँग्रेसची रणनीती सांगताना ते म्हणाले की, “आम्ही देश चालवणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचे दयनीय अपयश लोकांसमोर मांडत आहोत. लोकांनाही ते मुद्दे पटत आहेत आणि आमचा युक्तिवाद ते मान्य करत आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे बंगालमध्ये राज्य सरकारविरोधी जनमताचा कल दिसून येतो आहे. त्याचा आम्ही फायदा घेत आहोत. तृणमूल हा शब्द आता भ्रष्टाचाराला समानार्थी झाला आहे”, अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेसने पश्चिम बंगालमधील डाव्यांना हुसकावून लावण्यासाठी २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसशी केलेल्या हातमिळवणीबद्दल ते म्हणाले की, “ती त्या काळाची गरज होती. २०११ साली असलेला माकप पक्ष हा आताच्या माकप पक्षाच्या अगदी विरुद्ध होता. माकपने तेव्हा पोसलेले गुंड आता ममता बॅनर्जींचे जावई झाले आहेत.”


क्रिकेटर युसूफ पठाणचे आव्हान किती मोठे?

१९९९ मध्ये पहिल्यांदा लढवलेली निवडणूक आणि आताची निवडणूक यामधील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, “तेव्हा डाव्या पक्षाचे प्राबल्य अधिक होते. त्यात पश्चिम बंगालमधील काँग्रेसची राजकीय आणि संघटनात्मक अवस्था खराब होती. अशा परिस्थितीमध्ये १९९९ मध्ये, नवखा राजकारणी म्हणून डाव्यांचा पराभव करत निवडणूक जिंकणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. पण, आता परिस्थिती अगदी उलट आहे. पश्चिम बंगालमधील संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पश्चिम बंगालमध्ये अत्याचार, हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. डाव्या राजवटीतही आम्ही अत्याचार आणि हिंसाचाराला सामोरे गेलो होतो; पण आता त्यामध्ये फारच वाढ झालेली आहे. त्या काळात राजकीय युक्तिवादाला थोडी तरी जागा शिल्लक होती, आता ती जागा हिंसाचाराने घेतली आहे”, असा आरोपही त्यांनी केला.

भारताचे माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना तृणमूल काँग्रेस पक्षाने अधीर रंजन चौधरी यांच्याविरोधात उभे केले आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, “मतदानाचा हक्क असलेला आणि २४ वर्षांपेक्षा जास्त वय असलेला कुणीही व्यक्ती देशात कुठेही लढू शकतो, तो मुद्दा नाही. माझी लढाई ममता बॅनर्जी आणि भाजपाविरुद्ध आहे.”

हेही वाचा : हार-पुष्पगुच्छांचा खच, अभिवादनाचे हजारो हात, भाजप-मोदींच्या जयघोषात प्रचारफेरी..

पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याकांची मते कुणाला मिळतील, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, “काँग्रेस आणि डाव्यांकडे अल्पसंख्याकांची मते येऊ लागली आहेत. परंतु, अल्पसंख्याक अजूनही धोरणात्मक पद्धतीने विचार करून मतदान करतात. भाजपाचा पराभव करून तृणमूल एखादी जागा जिंकू शकेल असे त्यांना वाटत असेल, तर ते त्यांची मते तृणमूलला देतील; पण मला वाटते की जिथे जिथे काँग्रेस आणि डावे उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, तिथे अल्पसंख्याकांची संपूर्ण मते आम्हालाच मिळू शकतील.”