Premium

मावळमध्ये खासदार बारणे उमेदवारीवर निश्चिंत

तीन राज्यांतील विजयामुळे शहर भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या महायुतीत उत्साह आहे. तिन्ही पक्षांकडून लोकसभेची जय्यत तयारी सुरू आहे.

MP Barne candidacy in Maval
मावळमध्ये खासदार बारणे उमेदवारीवर निश्चिंत (image credit – Shrirang Appa Barne/fb)

पिंपरी : तीन राज्यांतील विजयामुळे शहर भाजपसह शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट या महायुतीत उत्साह आहे. तिन्ही पक्षांकडून लोकसभेची जय्यत तयारी सुरू आहे. तर, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच्या या महाविकास आघाडीत शांतता दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जत येथे झालेल्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी बारामती, शिरुर, रायगड, सातारा या जागाच लढविणार असल्याचे जाहीर केल्याने महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणेंची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे बारणे समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नरमाईची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – दानिश अली यांच्यावर निलंबनाची कारवाई; महुआ मोईत्रा यांचे समर्थन केल्यामुळे बसपाचा निर्णय?

पिंपरी-चिंचवड शहर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने महापालिका ताब्यात घेतली. शहरात भाजपची मोठी ताकद आहे. भाजपचे महेश लांडगे सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आमदार असून उमा खापरे या विधान परिषदेवर आहेत. भाजपचे संघटनही मजबूत आहे. भाजपखालोखाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत आहेत. शहर कार्यकारिणी, दोघांचा अपवाद वगळता सर्व माजी नगरसेवकही दादांसोबतच आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेचेही श्रीरंग बारणे खासदार आहेत. आता अजित पवारच भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे महायुतीची राजकीय ताकद वाढली आहे.

महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पदाधिकाऱ्यांवर सोपविली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असताना तिन्ही पक्षांनी मावळ लोकसभेवर दावा केला आहे. भाजपने लढण्याची तयारी असल्याचे सांगितले. मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीची जास्त ताकद असल्याचे सांगत मावळच्या जागेवर दावा ठोकला खरा पण, कर्जत येथे झालेल्या चिंतन शिबिरात अजित पवारांनी बारामती, शिरुर, रायगड, सातारा या जागा लढविणारच असल्याचे जाहीर केले. परिणामी, शेळके यांच्या दाव्यातील हवा निघून गेली. त्यामुळे महायुतीकडून खासदार श्रीरंग बारणेंची उमेदवारी निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा दाखला देत खासदार बारणे यांच्याकडून उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला जातो.

हेही वाचा – नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळावी म्हणून जेडीयूची धडपड; ‘इंडिया’वर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न?

दुसरीकडे महाविकास आघाडीत शांतता आहे. तिन्ही पक्षांमध्ये मरगळ दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या शरद पवार समर्थकांच्या मेळाव्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. पवार गट आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष केवळ कार्यकारिणी माध्यमांना पाठवून मोकळे झाले. ठाकरे गटामध्येही शांतता दिसून येत आहे. तीन राज्यांतील निकालांमुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचल्याचे दिसते. मावळची जागा ठाकरे गटाला सुटणार असल्याचे सांगितले जाते. पण, त्यांच्याकडे सक्षम उमेदवार दिसत नाही. भाजपचा एक माजी नगरसेवक इच्छुक होता. परंतु, दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघात लावलेल्या फलकांवर त्यांनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mp barane confident about candidacy in maval print politics news ssb

First published on: 10-12-2023 at 14:15 IST
Next Story
पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे भाजप नेत्यांचे नवाब मलिकांबाबत मौन