लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ६ डिसेंबर रोजी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, अनेक नेत्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांकडून काँग्रेसचे नेतृत्व झुगारून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून सर्वमान्यता मिळावी, यासाठी त्या-त्या पक्षातील नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार हेच कसे योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया आघाडीवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न?

रविवारपासून (१० डिसेंबर) इस्टर्न झोनल काऊन्सिलच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री तथा जेडीयू पक्षाचे सर्वेसर्वा नितीश कुमार हे उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीचे औचित्य साधून जेडीयू पक्षाकडून नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या बैठकीत नितीश कुमार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच इतर नेत्यांशी भेट होणार आहे.

जानेवारी महिन्यात नितीश कुमार अन्य राज्यांच्या दौऱ्यावर

या बैठकीबाबत तसेच इंडिया आघाडीच्या जागावाटप आणि पंतप्रधानपदाची उमेदवारी यावर जेडीयू पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “नितीश कुमार यांना अमूक पद मिळावे, अशी कोणतीही अट आम्ही इंडिया आघाडीसमोर ठेवलेली नाही. मात्र, आम्ही बिहारव्यतिरिक्त अन्य राज्यांशीही संवाद वाढवण्याचा प्रयत्न कत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून नितीश कुमार यांना उत्तर प्रदेशमधील फुलपूर, मिर्झापूर, वाराणसी या भागात बोलावण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात नितीश कुमार हे उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत”, असे के. सी. त्यागी यांनी सांगितले.

नितीश कुमार लोकांना हवे आहेत- के. सी. त्यागी

नितीश कुमार यांना झारखंड येथून आमंत्रित करण्यात आलेले आहे, असेही के. सी. त्यागी यांनी सांगितले. “नितीश कुमार यांना हरियाणा आणि महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या जातीच्या महासंघांनीही आमंत्रित केलेले आहे. बिहार राज्याने केलेल्या जातीआधारित सर्वेक्षणाचा परिणाम देशभरात होताना दिसतोय. समाजवादी विचार आणि विकासाच्या राजकारणामुळे नितीश कुमार हे लोकांना हवे आहेत”, असे के. सी. त्यागी म्हणाले.

“इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी एकत्र काम करणे गरजेचे”

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी तीन राज्यांत काँग्रेसचा पराभव झाल्यामुळे इंडिया आघाडीतील जागावाटप तसेच अन्य बाबींमध्ये जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, याचा प्रयत्न जेडीयू पक्षाकडून केला जात आहे का? असा प्रश्न त्यागी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना “आम्ही घाणेरडे राजकारण करत नाही. नितीश कुमार हे वेगवेगळ्या राज्यांना भेट देणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम फक्त जेडीयू पक्षाचा आहे. मात्र, भविष्यात आमच्या या कार्यक्रमात इंडिया आघाडीने येण्यास उत्सुकता दाखवल्यास आम्ही त्यांचादेखील यात समावेश करू. सध्या लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे, त्यामुळे इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी एकत्र मिळून काम करणे गरजेचे आहे”, असे त्यागी यांनी सांगितले.

“बैठकीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये”

इस्टर्न झोनल कौन्सिल बैठकीवर बोलताना “मी फक्त बिहारचा मुख्यमंत्री म्हणूनच प्रतिनिधीत्व करेन”, असे नितीश कुमार यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. या बैठकीत नितीश कुमार बिहारच्या समस्या अमित शाह यांच्यापुढे मांडणार आहेत. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे त्यागी यांनी स्पष्ट केले.

“लवकरात लवकर रणनीती आखावी लागेल”

दरम्यान, त्यांनी शेवटी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले. “आता विरोधकांनी एकत्र येऊन जागावाटप करावे, तसेच एकत्र सभा घ्याव्यात, हेच या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होत आहे. वेळ वेगाने जात आहे, इंडिया आघाडीला आपली रणनीती आखावी लागेल. सध्या बैठका आणि चर्चा खूप झाल्या आहेत”, असे मत त्यागी यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu trying to establish nitish kumar as opposition face prime minister candidate prd
Show comments