रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अखेर महायुतीतर्फे अपेक्षेनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दोन ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत रंगणार आहे.

या मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी पूर्वीपासूनच गृहीत धरलेली होती. गेल्या मंगळवारी त्यांनी अर्जही दाखल केला आहे. दुसरीकडे महायुतीच्या गोटात अनिश्चिततेचे वातावरण होते. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे किरण सामंत हेही येथे प्रबळ दावेदार होते आणि अखेरपर्यंत त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालवली होती. त्याचबरोबर, शिवसेनेचे धनुष्य-बाण हे चिन्ह मिळाले तरच आपण निवडणूक लढवू, असेही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. अखेर भाजपच्या दबावाला शरण जात आता शिंदे गटाला ही जागा भाजपासाठी सोडावी लागली आहे.

हेही वाचा – ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूंनी या जागेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच हक्क सांगत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि केंद्रीय मंत्री राणे यांची नावे चर्चेत आणली. राणे यांना तर पक्षश्रेष्ठींनी ‘तयारीला लागा’, अशी आदेशवजा सूचना केल्याचेही वृत्त सर्वत्र झळकले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना, आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. मात्र पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य करू, असे स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर भाजपाने राणे यांची उमेदवारी गुरुवारी अधिकृतपणे घोषित केली असल्याने या मतदारसंघातील लढतीचा विचार केला तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे भिन्न होती. येथील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी चिपळूण व कणकवली वगळता रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या चार मतदारसंघांमध्ये ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार होते. २०२२ च्या मध्याला शिवसेनेत फूट पडल्यानंतर या चारजणांपैकी रत्नागिरी व सावंतवाडीचे आमदार विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातील अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कणकवलीतून खुद्द राणेंचे धाकटे चिरंजीव नितेश, तर सावंतवाडी मतदारसंघातील शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर अशी ४ अनुभवी आमदारांची तगडी फौज राणेंच्या प्रचारासाठी उपलब्ध झाली आहे.‌ फक्त राजापूर आणि कुडाळ या दोन मतदारसंघांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाचे आमदार उरले आहेत. शिवाय, राणेंचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश यांना मागील निवडणुकीत उपलब्ध नसलेली भाजपा पक्ष संघटनेची यंत्रणा या वेळी दिमतीला असणार आहे.

हेही वाचा – जाट समाजाची भाजपावर नाराजी काँग्रेसच्या पथ्यावर?

हा तपशील पाहता ही लढाई कागदोपत्री राणेंच्या बाजूने झुकलेली दिसत आहे. पण या दोन जिल्ह्यांमधील वाड्या-वस्त्यांपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या ठाकरे गटाला कमी लेखून चालणार नाही. त्यांची सर्वांत महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे, सेनापती मैदान सोडून गेले असले तरी बरेचसे सैन्य मूळ जागी स्थिर आहे आणि आता जास्त त्वेषाने लढण्याच्या मूडमध्ये आहे. शिवाय, खासदार राऊत यांनी गेल्या लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये नीलेश यांचा पराभव झाला असल्याने या फौजेचे नीतीधैर्य उंचावलेले आहे. उलट, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये भाजपाचे मुख्य अस्तित्व शहरी किंवा निमशहरी भागापुरते मर्यादित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त एक, कणकवलीचे आमदार नीतेश राणे भाजपाचे आहेत. इतर दोघांपैकी कुडाळचे आमदार वैभव नाईक ठाकरे गटाचे, तर सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटाचे आहेत. यापैकी नाईक त्यांच्या पक्षाचे उमेदवार राऊत यांना मदत करणार, हे स्वाभाविकच आहे. पण पूर्वेतिहास लक्षात घेता, केसरकर राणेंना मनापासून किती सहकार्य करतात, यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राणेंचे मताधिक्य अवलंबून आहे. शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यात तर गेल्या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये राणेंना मताधिक्य घेता आलेले नाही. या वेळी या जिल्ह्यातील रत्नागिरी मतदारसंघातून शिंदे गटाचे वजनदार मंत्री विजय सामंत आणि चिपळूण मतदारसंघातून अजितदादा गटाचे निकम यांच्याकडून राणेंना मोठ्या अपेक्षा आहेत. त्या प्रत्यक्षात किती उतरतील, याची आत्ता हमी देणे कठीण आहे. या पडद्यामागच्या घडामोडी त्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे राणे विरुद्ध राऊत ही लढत निश्चितच रंगतदार होणार आहे.