उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी व काँग्रेस यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते; तर बहुजन समाज पक्ष (बसप)देखील निवडणुकीत दोन्ही गटांसाठी आव्हान उभे करील, अशी शक्यता वाटत होती. मात्र, सोमवारी (१ एप्रिल) राज्यात लहान पक्षांनी तिसरी आघाडी स्थापन केली. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या आगामी निवडणुकीचे चित्र काहीसे बदलले आहे.

‘पीडीएम न्याय मोर्चा’ची स्थापना

या आघाडीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम), अलीकडे सपाचा मित्रपक्ष असलेला अपना दल (कामेरवाडी), बाबुराम पाल यांच्या नेतृत्वाखालील अल्प-ज्ञात राष्ट्रीय उदय पक्ष व प्रेमचंद बिंद यांच्या नेतृत्वाखाली प्रगतिशील मानव समाज पक्ष यांचा समावेश आहे. ‘पीडीएम न्याय मोर्चा’, असे या नव्या युतीचे नाव आहे. ‘पिछडे, दलित व मुस्लीम’ यांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचा दावा या नवीन युतीने केला आहे. सपाच्या पीडीए (पिछडे, दलित, मुस्लीम) धोरणासह पीडीएमची थेट लढत पाहायला मिळणार आहे. नवीन आघाडी स्थापन झाल्याने सपाच्या मुस्लीम-यादव मतपेढीला तडा जाण्याची शक्यता आहे.

एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि अपना दल (के) नेत्या पल्लवी पटेल यांनी पीडीएम आघाडी स्थापन केली. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी सपाला लक्ष्य केले. “यूपीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत ९० टक्के मुस्लिमांनी सपाला मतदान केले; पण त्याचा परिणाम काय झाला? मुस्लीम समाजाचे नेतृत्व कोणालाही नको आहे. ते फक्त त्यांची मते मागतात”, असे ओवेसी म्हणाले. पटेल यांनी सपावर पीडीएच्या दाव्यांबाबत दुतोंडी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “सपाप्रमुख अखिलेश यादव यांनी अल्पसंख्याकांना प्राधान्य देण्याचे त्यांचे आश्वासन पूर्ण केले नाही.”

गेल्या काही निवडणुकांमध्ये एआयएमआयएम आणि युतीतील इतर पक्षांचे प्रदर्शन

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये हैदराबादमध्ये एआयएमआयएम फार चांगली कामगिरी करू शकला नाही. अपना दल (के)ने २०२२ मधील निवडणुकीत याहूनही वाईट कामगिरी केली. २०२२ ची निवडणूक ही अपना दल (के)ने लढवfलेली पहिलीच निवडणूक होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने ३८ जागा लढविल्या; परंतु एकही जागा जिंकली नाही. त्या निवडणुकीत एआयएमआयएमला एकूण मतांच्या केवळ ०.२४ टक्के मते मिळाली. २०२२ मध्ये त्यांनी तब्बल ९५ जागांवर उमेदवार उभे केले. २०२२ मध्येही निकाल तोच होता; केवळ मतांच्या टक्क्यात थोडी वाढ झाली. २०२२ च्या निवडणुकीत त्यांना एकूण मतांच्या ०.४९ टक्का मते मिळाली.

मे २०२३ मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एआयएमआयएमने चांगले प्रदर्शन केले. त्यांचे पाच उमेदवार नगरपालिका किंवा नगर पंचायत अध्यक्ष म्हणून निवडून आले. मेरठच्या महापौरपदाच्या शर्यतीत भाजपाने एआयएमआयएमचा पराभव केला. मात्र, सपापेक्षा एआयएमआयएम पुढे होते. उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीत एआयएमआयएम पहिल्यांदाच मैदानात उतरत आहे. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी बिहारमध्ये केवळ एक जागा लढवून तिसरे स्थान मिळवले होते.

दरम्यान, सोनीलाल पटेल यांनी १९९५ मध्ये बसपमधून वेगळे होत अपना दल पक्ष स्थापन केला होता. २०१६ मध्ये पक्षात पुन्हा फूट पडली. त्यानंतर अपना दल (कामेरवाडी) आणि अपना दल (सोनीलाल) असे दोन गट पडले. अपना दल (सोनीलाल)चे नेतृत्व सोनीलाल यांची मोठी मुलगी, पल्लवी यांची धाकटी बहीण आणि दोन वेळा खासदार राहिलेल्या अनुप्रिया करीत आहेत. २०१४ पर्यंत अपना दलने लोकसभेची एकही जागा जिंकली नव्हती. परंतु, २०१४ मध्ये भाजपाबरोबर युती केल्यानंतर पक्षाने दोन जागा जिंकल्या.

पक्षात फूट पडल्यानंतर अनुप्रिया यांचा गट अधिक प्रबळ पक्ष म्हणून उदयास आला. २०१९ मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभेच्या दोन जागा जिंकल्या. २०१९ मध्ये अपना दल (के)ने मात्र निवडणूकच लढवली नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पल्लवी यांच्या गटात संघर्ष पाहायला मिळाला. तर, दुसरीकडे अनुप्रिया यांच्या पक्षाने एनडीएमध्ये स्वतःची जागा तयार केली. २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत अपना दल (एस)ने लढविलेल्या ११ पैकी नऊ जागा जिंकल्या होत्या; तर अपना दल (के)ने लढविलेल्या दोनपैकी एकही जागा त्यांना जिंकता आली नाही. २०२२ मध्ये अपना दल (के)ने लढविलेल्या सहा जागांपैकी एकही जागा त्यांना जिंकता आलेली नाही.

जर का २०१७ आणि २०२२ च्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये एआयएमआयएम आणि अपना दल (के)ला मिळालेली मते एकत्रित केली तरी त्यांचा विजय झाला नसता. २०२२ मध्ये दोन्ही पक्षांना विधानसभेच्या १९ जागांवर विजयी फरकापेक्षा जास्त मते मिळाली. या निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना १०; तर सपाला नऊ जागा मिळाल्या होत्या. निवडणुकांची ही आकडेवारी पाहता, असे लक्षात येते की, एआयएमआयएम आणि अपना दल (के) उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चित्रात फार बदल करू शकणार नाही.

हेही वाचा : गुजरातमध्ये भाजपा अडचणीत? काय आहे क्षत्रिय- दलित वाद?

२०१७ मध्ये एआयएमआयएमने संभल लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघांत केवळ पाच टक्के मते मिळविली. इतर जागांवरही दोन्ही पक्ष फार चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत. २०२२ मध्ये या दोन्ही पक्षांनी केवळ चार जागांवर लक्षणीय मतांची नोंद केली. त्यात एआयएमआयएमने आझमगढमध्ये ३.४ टक्के आणि अपना दल (के)ने मिर्झापूरमध्ये ५.५ टक्के, प्रतापगडमध्ये ६.६ टक्के व वाराणसीमध्ये ६.३ टक्के मतांची नोंद केली.