बिहारमध्ये पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर यादव व्होटबँकेवरून वर्चस्वाची लढाई सुरू असल्याचे अप्रत्यक्षपणे दिसू लागले आहे. काँग्रेस आणि आरजेडी यांच्यातील जागावाटपाची चर्चा प्रामुख्याने पूर्णिया जागेवर अडकली आहे. माजी खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच आपला जन अधिकार पक्ष (JNP) काँग्रेसमध्ये विलीन केला आणि त्यांनी पूर्णियामधून निवडणूक लढवण्याचा निश्चित केला, तर राजदने जेडीयूमधून आलेल्या माजी मंत्री आणि रुपौली आमदार बिमा भारती यांना उमेदवारी देण्याची योजना आखली आहे. यादव यांच्या पत्नी रणजित रंजन या काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार आहेत.

पूर्णियामधून निवडणूक लढवण्याच्या अटीवर भारती अलीकडेच जेडीयूतून राजदमध्ये सामील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तीन डाव्या पक्षांनी पाच जागा लढवण्याच्या ऑफरवर तोडगा काढला आहे, तर काँग्रेसने पूर्णियासह किमान नऊ जागांची मागणी केली आहे. पप्पू यादव पूर्णियामधूनच निवडणूक लढवणार असल्याचं गेल्या आठवडाभरापासून प्रसारमाध्यमांना सांगत आहेत.

हेही वाचाः दीड वर्षे मेहनत करून राज्यमंत्री डॉ. कराड यांच्या पदरी निराशा

“मी या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे आणि तेथील लोकांच्या नेहमी संपर्कात आहे. मला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आहेत. मी माझे शरीर सोडू शकतो, पण पूर्णिया नाही,” असे यादव म्हणालेत. खरं तर पप्पू यादव यांना बिहार काँग्रेसचे प्रमुख अखिलेश प्रसाद सिंग यांचा पाठिंबा असल्याचे दिसत नाही. यादव मात्र या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या पाठिंब्यावर उभे आहेत.

आरजेडीच्या एका नेत्याने सांगितले की, आमची जागावाटपाची चर्चा पप्पू यादव आणि काँग्रेसच्या किमान नऊ जागांच्या मागणीवर अडकली आहे. आम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही पप्पू यादव यांना मधेपुरा किंवा सुपौल सीट देऊ करत आहोत. जर पप्पू यादव यांना पूर्णिया मतदारसंघ देण्यात आला. तर बीमा भारती यांना भागलपूरमधून जेडीयूचे खासदार अजय मंडल यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास सांगितले जाऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. सासाराम, किशनगंज, कटिहार, मोतिहारी, पश्चिम चंपारण, मुझफ्फरपूर, पाटणा साहिब, सुपौल आणि भागलपूर या जागांवर काँग्रेसकडून चर्चा होत आहे. तर सीपीआयने बेगुसराय मतदारसंघातून आपला उमेदवार आधीच जाहीर केला आहे.