आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघात भाजपा विरूद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आसाममधील काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा आणि खासदार गौरव गोगोई जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यांना यंदा पक्षाने त्यांच्या विद्यमान मतदारसंघाऐवजी जोरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये ते निवडणूक प्रचार करताना दिसत आहेत. दोन टर्म खासदार राहिलेले गोगोई पहिल्यांदाच जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. सध्या ते कालियाबोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

जोरहाटमधून गोगोई पहिल्यांदाच लढवणार निवडणूक

त्यांचे वडील आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई आणि काका दीप गोगोई यांनी कालियाबोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गौरव गोगोई सध्या ईशान्येकडील सर्वात प्रमुख खासदारांपैकी एक आहेत. त्यांना काँग्रेस कोणत्या मतदारसंघाचे तिकीट देणार याबद्दल सुरुवातीला अनिश्चितता होती, परंतु पक्षाने शेवटी त्यांना जोरहाटमधून उमेदवारी दिली. उमेदवार म्हणून हा मतदारसंघ गौरव गोगोई यांच्यासाठी नवीन असला तरी त्यांच्या कुटुंबासाठी हा मतदारसंघ परिचयाचा आहे. तरुण गोगोई हे १९७१ पासून तीन वेळा जोरहाटचे खासदार म्हणून निवडून आले होते. २००१ पासून ते २०२० मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत त्यांनी टिटाबोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तरुण गोगोई हे तीन वेळा असामचे मुख्यमंत्रीही होते.

गौरव गोगोई पहिल्यांदाच जोरहाटमधून निवडणूक लढवणार आहेत. (छायाचित्र-पीटीआय)

हेही वाचा : इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्याचा मुलगा लढवणार लोकसभा निवडणूक, कोण आहेत सरबजित सिंग खालसा?

काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत

अप्पर आसामच्या पाच जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे, त्यामध्ये जोरहाट ही जागा प्रतिष्ठेची आहे. जोरहाट जागेसाठी गौरव आणि भाजपाचे विद्यमान खासदार टोपन गोगोई यांच्यात लढत रंगणार आहे. भाजपा नेते हे सोनारी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदारदेखील आहेत. सोनारी ही जागा जोरहाटमधील विधानसभा क्षेत्रांपैकी एक आहे.

गौरव गोगोई आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यात दीर्घकाळापासून मतभेद आहेत. मुख्यमंत्री सरमा नेहमीच गोगोई यांच्यावर टीका करताना दिसतात. मुख्यमंत्री सरमा यांनी त्यांच्या लोकसभा प्रचाराची सुरुवात ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेल्या माजुली बेटापासून केली, जो आता भाजपाचा बालेकिल्ला आहे. बुधवारी (१७ एप्रिल) संध्याकाळी त्यांनी शिवसागरमध्ये सभेचे आयोजन केले असून या सभेद्वारे ते पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवट करणार आहेत. माजुली आणि शिवसागर या दोन्ही जागा जोरहाट मतदारसंघाचा भाग आहेत. मंगळवारीही (१६ एप्रिल) त्यांनी मतदारसंघातील दोन मोठ्या सभांना संबोधित केले. एक सभा माजुली, तर दुसरी आमगुरी येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी ईदच्या वेळी नमाज पठन केल्याबद्दल गौरव गोगोई यांची खिल्ली उडवत त्यांच्यावर टीका केली.

काँग्रेसची भव्य सभा आणि आश्वासने

मंगळवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी गौरव गोगोई आणि इतर राज्य काँग्रेस नेत्यांसह टिटाबोरमध्ये मोठ्या सभेचे नेतृत्व केले. या सभेत त्यांनी चहा बाग कामगारांचे वेतन वाढवण्याचे आश्वासन दिले. गौरव गोगोई यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, मतदारांपर्यंत पोहोचताना ते आरोग्यसेवा, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेवर भर देत आहेत. “आम्ही ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे, त्यात लोकशाही आणि भाषण स्वातंत्र्याचादेखील समावेश आहे. हे सरकार सरकारी एजन्सी आणि यंत्रणेचा वापर करून लोकांना गप्प बसवत आहे. आता स्वतः मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना या जागेवर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. मला असे वाटते की, लोक ज्या उत्साहाने आम्हाला पाठिंबा देत आहेत, ते मतांमध्ये नक्कीच परिवर्तीत होईल आणि एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अप्पर आसाममधील जोरहाटमध्ये आम्ही निवडून येऊ. या जागेवरील विजयाचा एकंदरीत राज्याच्या राजकरणावर मोठा परिणाम होईल”, असे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांनी चहा बाग कामगारांचे वेतन वाढवण्याचे आश्वासन दिले. (छायाचित्र-पीटीआय)

टिटाबोरमधील काही मतदारांचे म्हणणे आहे की, या जागेवर गौरव गोगोई यांना सहज जिंकता येईल. “आम्ही अनेक दशकांपासून काँग्रेसला मतदान करत आहोत. आमचे भास्कर ज्योती बरुआही काँग्रेसचेच आहेत. येथे आम्ही टोपोन गोगोई यांना ओळखत नाही”, असे एका स्थानिकाने सांगितले.

भाजपाच्या प्रचाराची रणधुमाळी

जोरहाट हा विस्तीर्ण मतदारसंघ आहे. या जागेवरील काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार दोघेही अहोम समुदायाचे आहेत. जोरहाट जागेवरील सुमारे १७ लाख मतदारांपैकी ३० टक्क्यांपेक्षा जास्त मतदार अहोम समुदायातील आहेत. भाजपा नेते आपल्या प्रचार सभांमध्ये अहोम सेनापती लचित बारफुकन यांच्या पुतळ्याचा उल्लेख करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जोरहाट शहराजवळील होलोंगापर येथे लचित बारफुकन यांच्या १२५ फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले होते.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एका सभेत नमाज पठन केल्याबद्दल गौरव गोगोई यांच्यावर टीका केली. (छायाचित्र-पीटीआय)

चहा कामगारांमध्ये भाजपाची संघटनात्मक पोहोच अधिक मजबूत आहे. जोरहाट जिल्ह्यात मिसिंग आणि थेंगल कचारी या प्रमुख जमातीही आहेत. यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. जोरहाट लोकसभा मतदारसंघातील १० विधानसभा क्षेत्रांपैकी पाचमध्ये भाजपाचे आमदार आहेत. इतर पाच क्षेत्रांमध्ये भाजपाचे भागीदार असलेल्या असम गण परिषदेचे दोन आमदार, काँग्रेसचे दोन आमदार आणि काँग्रेसशी युती असलेल्या प्रादेशिक पक्षातून एक अपक्ष आहे.

जोरहाटजवळील चुराईबारी येथे एका सभेला संबोधित करताना, टोपोन गोगोई यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांवर भर दिला. आसाम सरकारची ओरुनोडोई योजना आणि केंद्राची लखपती दीदी योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थी बहुतांश महिला आहेत. “आम्हाला ओरुनोडोई योजनेचा आणि घरांचा लाभ मिळालेला नाही, पण या चांगल्या योजना आहेत. आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत,” असे एका स्थानिक आशा कार्यकर्त्याने सांगितले.

हेही वाचा : बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?

प्रदेशातील अनेक काँग्रेस नेते भाजपात सामील

गौरव गोगोई यांनी आपल्या कुटुंबीयांचा मतदारसंघात मांडलेल्या इतिहासाबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंतनू पुजारी म्हणाले, “सहाजिकच, काँग्रेसचे जुने संबंध आहेत, पण आमचा संघटनात्मक पाया मजबूत आहे आणि आमच्या योजनांचे बहुसंख्य लाभार्थीही आहेत.” त्यांनी काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशाचादेखील उल्लेख केला. मारियानीचे आमदार रूपज्योती कुर्मी, थाउराचे आमदार सुशांत बोरगोहाई आणि आसाम काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष राणा गोस्वामी यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख काँग्रेस नेते अलीकडच्या काळात भाजपामध्ये सामील झाले आहेत.