Premium

तेलंगणात निवडणुकीच्या धामधुमीत ‘फार्महाऊस’ची चर्चा; केसीआर यांचा ‘फार्महाऊस सीएम’ म्हणून उल्लेख का होतोय?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीदेखील प्रचारादरम्यान केसीआर यांच्यावर टीका केली.

kcr telangana election
केसीआर (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

येत्या ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पूर्ण ताकदीने प्रचार करण्यात आला. या प्रचारादरम्यान विरोधकांनी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना लक्ष्य केले. केसीआर यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार वाढला आहे. गेल्या अनेक वर्षांत तेलंगणाचा विकास झालेला नाही, असा आरोप या काळात करण्यात आला. यासह प्रचाराच्या धामधुमीत केसीआर यांचा ‘फार्महाऊस सीएम’ असा वारंवार उल्लेख करण्यात आला. याच कारणामुळे केसीआर आणि फार्महाऊस यात काय संबंध आहे, असे विचारले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नोदी, अमित शाह यांची टीका

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तेलंगणा दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान या नेत्यांनी तेलंगणात वेगवेगळ्या सभा घेत भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणादरम्यान, या दोन्ही नेत्यांनी केसीआर यांचा फार्महाऊस सीएम असा उल्लेख केला. तुम्हाला फार्महाऊस सीएम हवे आहेत का? असे प्रश्न हे दोन्ही नेते सभेला उपस्थित असलेल्या श्रोत्यांना विचारत होते.

केसीआर फार्महाऊसमधूनच सरकार चालवतात, विरोधकांचा आरोप

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीदेखील प्रचारादरम्यान केसीआर यांच्यावर टीका केली. ‘केसीआर यांना पुन्हा फार्महाऊसमध्ये पाठवा,’ असे आवाहन या नेत्यांकडून केले जात होते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर केसीआर हे फार्महाऊसमधूनच सरकार चालवतात, असा गंभीर आरोप केला.

केसीआर आणि फार्महाऊसचा संबंध काय?

मेडक जिल्ह्यातील एर्रावेल्ली या गावात साधारण १२० एकर परिसरात केसीआर यांचे एक फार्महाऊस आहे. हैदराबाद शहरापासून साधारण ६५ किलोमीटर अंतरावर हे फार्महाऊस आहे. केसीआर स्वत:ला शेतकरी म्हणतात. याच फार्महाऊसच्या परिसरात त्यांनी अनेक पिकांची लागवण केलेली आहे. या फार्महाऊसवर केसीआर वारंवार जातात. याच कारणामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर फार्महाऊस सीएम म्हणत टीका केली जाते.

यज्ञासाठी बोलवले होते १५०० पुजारी

केसीआर २०१५ साली याच फार्महाऊसमुळे चर्चेत आले होते. कारण २०१५ सालाच्या डिसेंबर महिन्यात त्यांनी पाच दिवसांचा आयुथा चंडी महायज्ञ आयोजित केले होते. या यज्ञासाठी एकूण १५०० पुजारी बोलवण्यात आले होते. यशाच्या आड येणारे अडथळे दूर करण्यासाठी तसेच नव्याने निर्मिती झालेल्या तेलंगणात शांती नांदावी यासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. या यज्ञासाठी केसीआर यांनी काही हेलिकॉप्टर्स भाड्याने घेतले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, श्री श्री रविशंकर तसेच वेगवेगळे धर्मगुरूदेखील उपस्थित होते.

केसीआर यांनी फार्महाऊसला शेवटची भेट कधी दिली?

केसीआर या फार्महाऊसला नेहमीच भेट देतात. या विधानसभा निवडणुकीसाठी गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याआधी केसीआर या फार्महाऊसवर आले होते. येथे त्यांनी राज्य शामला संहिता सुब्रमण्येश्वरा यज्ञ केला होता. बीआरएचा विजय तसेच जनतेच्या कल्याणासाठी या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, असे तेव्हा सांगण्यात आले होते. या यज्ञासाठी एकूण तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यातून १७० वेदिक पुजारी आणण्यात आले होते. यज्ञासाठी एकूण तीन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

फार्महाऊसच्या भेटीनंतरच अनेक योजनांची घोषणा

वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी केसीआर याच फार्महाऊसला भेट देतात. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेकदा या फार्महाऊसला भेट दिल्यानंतरच केसीआर यांनी अनेक योजनांची घोषणा केलेली आहे.

फार्महाऊसवरून विरोधकांची टीका

केसीआर यांच्या याच कथित फार्महाऊस प्रेमावरून विरोधकांनी वेळोवेळी टीका केली केलेली आहे. केसीआर हे लोकांची भेट घेत नाहीत. त्यांनी फार्महाऊसला भेट देण्याऐवजी लोकांच्या भेटी घेतल्या पाहिजेत. ते लोकांसाठी नेहमीच अनुपलब्ध असतात, असा आरोप विरोधकांकडून केला जातो.

“फार्महाऊसमध्ये योजनांचे मूल्यांकन”

तर दुसरीकडे विरोधकांच्या या आरोपांचे बीआरएसकडून खंडन केले जाते. “बीआरएस सरकारने ज्या योजना किंवा कार्यक्रम राबवलेले आहेत, त्यांचे केसीआर आढवा घेतात. बीआरएस सरकारच्या अनेक योजना त्यांच्या आढवा घेण्याच्या सवयीमुळेच यशस्वी ठरलेल्या आहेत. योजनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याचे ते कटाक्षाने मुल्यमापन करतात. फार्महाऊसला भेट दिल्यानंतर ते तेथे आराम करत नाहीत, तर खूप काम करतात. वेगवेगळ्या योजनांबाबत विचार करत असतात,” अशी प्रतिक्रिया बीआरएसचे नेते बी विनोद यांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Telangana assembly election 2023 opposition calls cm k chandrashekar rao as farmhouse cm prd

First published on: 28-11-2023 at 18:26 IST
Next Story
तमिळनाडूत व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे अनावरण, अखिलेश यादव यांची उपस्थिती; विरोधकांचा ओबीसी राजकारणावर भर!