भाजपाने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. निकम यांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकम यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्राचे माजी पोलिस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा उल्लेख केला. या पुस्तकात मुश्रीफ यांनी असा आरोप केला आहे की, २६/११ चा दहशतवादी अजमल कसाब याने आयपीएस अधिकारी आणि तत्कालीन राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या केली नाही, तर संघाशी संबंधित एका पोलिस अधिकाऱ्याने केली होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले, असे आरोप निकम यांच्यावर करण्यात आले. उज्ज्वल निकम यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत या आरोपांवर, भविष्यातील योजनांवर, भाजपावरील संविधान बदलाच्या आरोपावर यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न

२६/११ च्या अजमल कसाब प्रकरणावरून विरोधकांनी निकम यांच्यावर अनेक आरोप केले. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला ‘कसाब समर्थक’ म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना निकम म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली कारण विरोधकांनी कोणताही पुरावा नसताना माझी प्रतिमा खराब करण्यासाठी असे वक्तव्य केलं. वडेट्टीवार पूर्णपणे खोटे बोलत आहेत. पण, मला राजकीय युद्धात उतरायचे नाही.

हेही वाचा : १९८१ मध्ये राजीव गांधींनी अमेठीत मिळविला होता विक्रमी विजय; जाणून घ्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा इतिहास

गेल्या १० वर्षांत आपल्या देशात एकही बॉम्बस्फोट नाही

राजकारणात उतरण्यासाठी आणि मुंबईतील निवडणूक लढवण्यासाठी भाजपाची निवड का केली, असा प्रश्न केला असता निकम म्हणाले की, भाजपाने मला आमंत्रण दिले होते. माझी आणि त्यांची विचारसरणी सारखी आहे, त्यामुळे मी भाजपात सामील होण्याचा विचार केला. ४० वर्षांहून अधिक काळ विशेष सरकारी वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना मी राष्ट्रीय सुरक्षा हा प्रमुख मुद्दा मानला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या नजरेत देशाची प्रतिमा उंचावली आहे, हे सांगण्यास मला अजिबात संकोच नाही. अवघ्या दहा वर्षांच्या कालावधीत संपूर्ण जगाने भारताला एक मजबूत देश म्हणून ओळखले आहे. गेल्या १० वर्षांत आपल्या देशात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही, दहशतवादी कारवाया करण्याचा कोणताही गुन्हेगारी कट रचलेला नाही. मोदी सरकारने अशा भ्याड हल्ल्यांना खंबीरपणे प्रत्युत्तर देण्याचे ठरवल्याने हे घडले आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात झोपडपट्टीत राहणाऱ्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंतचे मतदार आहेत. त्यांच्या समस्यांविषयी आणि त्यांच्या निराकरणाविषयी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, निवडणुकीला आता फार थोडे दिवस उरले आहेत आणि वेळ संपत चालला आहे. मी प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक परिसरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांच्या समस्या समजून घेणार आहे.

“आम्हीही ‘कच्चे खिलाडी’ नाही”

काँग्रेसने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर बोलताना निकम म्हणाले की, प्रतिस्पर्धी उमेदवार वैयक्तिक शत्रू नसतात. उमेदवार त्यांच्या विचारधारेवर लढतात. त्या अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी आहेत, पण आम्हीही ‘कच्चे खिलाडी’ नाही. निवडणुकांमध्ये लोक पाहतात आणि ठरवतात की, विशिष्ट राजकीय पक्ष देशासाठी काही चांगले करू शकतो की नाही. आम्ही पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने देश मजबूत करण्यासाठी केलेल्या कामाचे अनुसरण करू.

खासदार म्हणून निवडून आल्यास संसदेसमोर कोणते नवीन कायदे सुचवाल, असा प्रश्न केला असता, निकम म्हणाले, “मला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सोपी करायची आहे. सध्याच्या कायद्यानुसार, दोन देशांदरम्यान प्रत्यार्पण करार असला तरीही प्रथमदर्शनी खटला निकाली काढायचा की नाही याचा निर्णय संबंधित देश / राज्याच्या कायद्यानुसार घेतला जातो. प्रत्यार्पणाची कार्यवाही सुरू करण्यासाठी विनंती करणाऱ्या राज्याला संबंधित देश किंवा राज्यातील न्यायालयात सर्व पुरावे सादर करावे लागतात. त्यानंतर राज्य किंवा देश त्यांच्या कायद्याच्या आधारे त्या पुराव्याचे मूल्यांकन करतो. मला या प्रक्रियेला सुव्यवस्थित करायचे आहे.

कोणतीही व्यक्ती संविधान बदलू शकत नाही

भाजपावर विरोधकांनी केलेल्या संविधान आरोपावर उज्ज्वल निकम म्हणाले की, हे पूर्णपणे खोटे आहे. आपली राज्यघटना खूप मजबूत आहे. सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे की, कोणतीही व्यक्ती संविधान बदलू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या काळातही राज्यघटनेत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत राज्यघटना बदलली जाणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, वकिलांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे, कारण ते अंदाज बांधू शकतात, संसदेत चांगले कायदे मांडू शकतात आणि काही सूचनाही करू शकतात. त्यांचा अनुभव राजकारणात उपयोगी पडेल.

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपाने दोन टर्मच्या खासदार पूनम महाजन यांच्या जागी तुम्हाला उमेदवारी दिली. याविषयी तिच्याशी काही बोलणे झाले का, या प्रश्नावर निकम म्हणाले की, मी त्यांना (पूनम महाजन) फार पूर्वीपासून ओळखतो. त्यांच्या वडिलांच्या (प्रमोद महाजन) खून खटल्यात मी खटला चालवला होता. मी शुक्रवारी (३ मे) उमेदवारी अर्ज सादर केला. मी त्यांना फोन करेन आणि त्यांच्या सोयीनुसार भेटही घेईन.