scorecardresearch

वाय एस शर्मिला यांनी मुख्यमंत्री KCR यांना दिला बुटाचा जोड भेट; म्हणाल्या, “हिंमत असेल तर…”

“जनतेला समस्या असल्यास केसीआर यांना मुख्यमंत्र्यांना…”

Y s sharmila
वाय एस शर्मिला ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

तेलंगणात यावर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) घेरण्यासाठी काँग्रेस, भाजपा आणि युवाजन श्रमिका रिथू तेलंगणा पक्ष ( वाएसआरटीपी ) यांनी तयारी केली आहे. अशातच ‘वाएसआरटीपी’च्या सर्वेसर्वा वाय एस शर्मिला यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर केसीआर यांनी माझ्याबरोबर पदयात्रेत सहभागी व्हावं. राज्यात काही समस्या नसतील, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं आव्हान वाय एस शर्मिला यांनी दिलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वाय एस शर्मिला यांनी पदयात्रा काढली आहे. “राज्यात सर्वजण सुखात आहेत. कोणतीही समस्या नाही,” असं विधान केसीआर यांनी केलं होतं. त्यावरून वाय एस शर्मिला यांनी केसीआर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा : दीड एकर जमीनवरुन रणकंदन; ममता बॅनर्जी विरुद्ध विद्यापीठ व्हाया केंद्र सरकार असा राजकीय वाद

गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बुटांच्या जोडीचा बॉक्स दाखवत वाय एस शर्मिला म्हणाल्या की, “केसीआर यांना भेट देण्यासाठी एक बूटाची जोड खरेदी केली आहे. हिंमत असेल, तर केसीआर यांनी माझ्याबरोबर पदयात्रेत सहभागी व्हावं. त्यांनी सांगितल्यानुसार राज्यात काही समस्या नसेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन.”

हेही वाचा : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या नव्या पक्षाकडे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा ओढा

“पण, जनतेला समस्या असल्यास केसीआर यांना मुख्यमंत्र्यांना राजीनामा देत, राज्यातील जनतेची माफी मागवी लागेल. तसेच, वचन दिल्याप्रमाणे दलित व्यक्तीला मुख्यमंत्री बनवावे. केसीआर यांनी खूप आश्वासनं दिली होती. पण, ते पूर्ण करण्यात केसीआर अपयशी ठरले,” असं वाय एस शर्मिला यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 16:11 IST