अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यातील अनेक ठिकाणी सराफ बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असला, तरी पुण्यातील सराफांनी या मुहूर्तावर सोमवारी दुकाने बंद ठेवल्यामुळे साधारणत: तीनशे ते पाचशे कोटी रुपयांची उलाढाल सोमवारी ठप्प होती.
अक्षय तृतीया हा सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त समजला जातो. त्यामुळे नेहमीपेक्षा अक्षय तृतीयेला सोने खरेदी जास्त प्रमाणात होते. मात्र, या वर्षी एलबीटीला विरोध करण्यासाठी दुकाने बंद ठेवली. मुळातच लग्नसराई, सोन्याचे उतरलेले भाव आणि अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून नेहमीपेक्षा मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, व्यापाऱ्यांनी दुकानेच बंद ठेवल्यामुळे ग्राहकांची अडचण झालीच; पण सराफ बाजाराचेही नुकसान झाले आहे. सराफी दुकानांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कारागिरांचेही या बंद मुळे नुकसान झाले आहे.
दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्यातील सराफ बाजारामध्ये साधारण तीनशे ते पाचशे कोटी रूपयांची उलाढाल होते. मात्र, यावर्षी दुकाने बंद असल्यामुळे पुण्यातील काही ग्राहकांनी तर बाहेरगावी जाऊन सोने खरेदी करण्याचा पर्याय स्वीकारला. याबाबत पु. ना. गाडगीळचे अजित गाडगीळ यांनी सांगितले, ‘‘अक्षय तृतीयेला नेहमीपेक्षा सोने खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद जास्त असतो. मुळातच लग्नसराईचे दिवस असल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची विक्री जास्त होते. आताही लग्नासाठी दागिने घेण्यासाठी पुण्यातील अनेक ग्राहक साताऱ्याच्या दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी आले होते. अक्षय तृतीयेला दुकाने बंद असल्यामुळे नेमके किती नुकसान झाले, हे सांगता येऊ शकत नाही. मात्र, आताच्या बंदने सराफ बाजाराचे नक्कीच नुकसान केले आहे.’’ रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका यांनी सांगितले, ‘‘दिवाळी आणि लग्नसराई या काळात सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. मात्र, शासनाच्या धोरणामुळे पुण्यातील सराफ बाजाराला मोठय़ा नुकसानाला तोंड द्यावे लागत आहे. आतापर्यंत अक्षय तृतीयेला पुण्यातील सराफ बाजार कधीच बंद नव्हता.’’
सराफ बाजार बंद असूनही सोन्याचे ऑनलाईन बुकिंगमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणावर वाढ झालेली दिसत नसल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. सोन्याचे ऑनलाईन बुकिंग करण्याबाबत ग्राहकांमध्ये अजून पुरेशी जागरुकता नाही. त्यामुळे सोन्याच्या ऑनलाईन बुकिंगच्या पर्यायाला मात्र फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.