पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातील ते एक महत्त्वाचे केंद्र! तिथे या वास्तूच्या सहवासात गेल्यावर तिच्या भाळी कोरलेले ते कलाशिल्पच आधी खुणावू लागते. प्रत्येकामध्ये दडलेले ते रसिकमन जागवू पाहते. गेली अनेक वर्षे हा अदृश्य व्यवहार सुरू आहे. या नात्याला मंगळवारी ३० वर्षे पूर्ण होत आहेत.
ही कथा आहे पुण्यातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराच्या भाळी कोरलेल्या त्या कलाशिल्पाची. साहित्य, कला, संस्कृती आणि उद्योग अशा विविध क्षेत्रांचा स्पर्श असलेला हा शहरातील सर्वात मोठा शिल्पपट. २१ जुलै १९८५ रोजी त्याचे अनावरण झाले होते. त्यानंतर गेली ३० वर्षे तो त्याच कलासक्तीने रसिकांचे मन जिंकून घेत आहे.
बालगंधर्वची निर्मिती झाल्यावर त्याच्या दर्शनी भागावर या वास्तूची ओळख सांगणारा एखादा शिल्पपट असावा अशी कल्पना पुढे आली. तत्कालीन आयुक्त अरुण बोंगीरवार यांनी यासाठी पुढाकार घेतला तर भारत फोर्ज उद्योग समूहाने आर्थिक पाठबळ पुरवले. अनेक कलाकारांची चाचपणी झाल्यावर सुधाकर चौधरी आणि संजय दादरकर या कलाकारांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी हा शिल्पपट कसा असावा याचा अभ्यास करत यासाठी ‘ललित कला’ हा विषय निवडला. नृत्यकलेतील नटराज, संगीतातील वाद्ये, नाटय़कलेतील मुखवटे, तर साहित्यातील ‘श्री’ या अक्षरास या शिल्पपटात स्थान देण्यात आले. या कलाकृतीस ‘भारत फोर्ज’ने दिलेले अर्थसाहाय्य लक्षात घेऊन हा सारा शिल्पपट एखाद्या यंत्राप्रमाणे (क्रँकशाफ्ट) बनविण्यात आला.
तब्बल ९० फूट लांब आणि १५ फूट रुंद असलेले हे शिल्प बनविणे एक आव्हान होते. ते तुकडय़ांमध्ये बनवून जागेवर जोडण्यात आले. हा सर्व भाग उघडय़ावर असल्याने ऊन, वारा आणि पावसापासून बचावासाठी ही कलाकृती तयार करताना ‘सिरॅमिक’चा वापर करण्यात आला. ही ‘म्युरल्स’ विशिष्ट तापमानात भाजून मग त्यावर रंग चढवण्यात आले. या वेळी त्यामध्ये काचेच्या भुकटीचाही वापर करण्यात आला. या साऱ्यांमुळे आज ३० वर्षांनंतरही ही कलाकृती नवीकोरी वाटत आहे. दुर्दैवाने ही कलाकृती साकारणाऱ्या दोन्ही कलाकारांचे अकाली निधन झाले. पण या कलाकृतीतून त्यांचे स्मरण आजही चिरंजीव असल्याचे दादरकर यांच्या पत्नी आणि या प्रकल्पातील सहकलाकार राजश्री दादरकर यांनी सांगितले.
पुलं’चा सहभाग
या शिल्पपटाच्या निर्मितीत पु. ल. देशपांडे यांचाही सहभाग होता. ही कल्पना साकारताना त्यांनी अनेक बदल सुचविले. या कलाकृतीमध्ये सुरुवातीस साहित्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘ओम’ हे अक्षर ठरवले होते. पण ‘पुलं’नी कलांचा श्रीगणेशा म्हणून ‘श्री’ हे अक्षर घेण्यास सुचविले.