राजगुरुनगर तालुक्यातील कोिहडे खुर्द येथे आठ वर्षांपूर्वी झालेल्या बेवारस व्यक्तीच्या खुनाचा नुकताच उलगडा झाला. विशेष म्हणजे हा खून एका निनावी पत्रामुळे उघडकीस आला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
विकास नावाच्या २८ वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह एप्रिल २००७ मध्ये कोिहडे खुर्द येथे खोल चारीत मिळून आला होता. पोलिसांनी या बाबत बेवारस मृतदेहाची नोंद करून याबाबतचा तपास थांबवला होता. काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना आलेल्या निनावी पत्रातून संबंधित प्रकार हा खुनाचा असल्याची बाब समोर आली. याबाबत तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी संजय ऊर्फ ढवळा जिजाबा बुरसे (वय ३२), तारकनाथ ऊर्फ बाळू तुकाराम इचके (वय ३४) सुनील ऊर्फ भावडय़ा रावजी तनपुरे (वय २८) व तुकाराम विठ्ठल गोपाळे (वय २५, सर्वजण रा. खारघर, पनवेल; मूळ रा. बुरसेवाडी, ता. रागजुरुनगर) या चौघांना अटक केली आहे.
या बाबत चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुरसे याच्या साखरपुडय़ात फोटो काढण्यासाठी दारू पिऊन वाद घालणाऱ्या विकास याला या चार आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यात तो रक्तबंबाळ झाला. त्याला दुचाकीवर बसवून दूर नेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला कोिहडे खुर्द येथील चारीत टाकून देण्यात आले. याबाबत पोलिसांनी बेवारस मयत अशी नोंद केली होती. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांना काही दिवसांपूर्वी निनावी पत्र आले. त्यात ही माहिती देण्यात आली होती. त्यावरून या गुन्ह्य़ाचा उलगडा झाला. याबाबत चाकण ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.