बेळगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलनासाठी येणाऱ्या नाटय़रसिकांना ‘वंशकुसुमा’ची भेट मिळणार आहे. मराठी रंगभूमीचे आद्य मानकरी बेळगावमध्येच घडले, याचा सार्थ अभिमान ‘वंशकुसुम’ या स्मरणिकेच्या पानापानांतून झळकणार आहे.
बेळगाव येथे ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ९५वे नाटय़संमेलन होत आहे. अडचणींचे डोंगर पार करीत हे संमेलन साधेपणाने यशस्वी करण्याचा निर्धार बेळगावकरांनी केला आहे. बेळगावस्थित ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘वंशकुसुम’ या कवितासंग्रहाचे शीर्षकच स्मरणिकेसाठी निवडण्यात आले आहे. वंश म्हणजे बांबू. बेळगाव हे पूर्वीपासून बांबूचे क्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध आहे. येथील कित्येक घरामध्ये हा वंशवृक्ष दिसतो, मात्र हे झाड कित्येक वर्षांनी एकदाच फुलते. बांबूचा बहर हे दुर्मिळ, पण प्रेक्षणीय असे दृश्य असते. बेळगाव येथे संमेलनदेखील ५८ वर्षांनी होत आहे. ही हवीहवीशी दुर्मिळ घटना कायमस्वरूपी स्मृतींच्या कोंदणात ठेवण्यासाठी ‘वंशकुसुम’ हे स्मरणिकेचे शीर्षक योग्य असल्याचे संपादक मेघा मराठे यांनी सांगितले.
मराठी रंगभूमीचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किलरेस्कर, नाटय़ाचार्य गोिवद बल्लाळ देवल यांच्या कर्तृत्वाचा मागोवा घेणारे खास लेख या स्मरणिकेमध्ये आहेत. बालगंधर्वाच्या नाटकांना बेळगाव, हुबळी, धारवाड, गदग या ठिकाणी होणारी गर्दी आणि त्या काळच्या वातावरणाचा स्मृतिगंध असेल. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांच्या उपक्रमांची दखल या स्मरणिकेमध्ये घेण्यात आली असून, इंदिरा संत, कृ. ब. निकुंब, शंकर रामाणी, अनंत मनोहर आणि माधुरी शानभाग या बेळगावकर साहित्यिकांचे कर्तृत्व यासह ग्रिप्स रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमी याविषयीचे लेख स्मरणिकेमध्ये समाविष्ट आहेत.
 अनुदानाच्या प्रतीक्षेत
बेळगाव येथील नाटय़संमेलनासमोर निधिसंकलनाचा प्रश्न उभा ठाकला आहे. विशेष बाब म्हणून राज्य सरकारने या संमेलनासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, संमेलन आता चार दिवसांवर येऊन ठेपले असले तरीही हा निधी मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहोत, अशी माहिती नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी दिली. संमेलनाच्या निधिसंकलनासाठी आयोजित नाटय़महोत्सवास रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, त्या माध्यमातून किमान १५ लाख रुपयांचा निधी संकलित होईल. स्मरणिकेद्वारे निधिसंकलनाचे उद्दिष्ट ठेवलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.