पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आपल्या मनात असलेल्या सूचना सरकापर्यंत पोहोचवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. राज्याच्या टपाल खात्यातर्फे ‘भविष्य वाचवा’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात नागरिकांसाठी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हे लेखन केवळ टपाल सेवेचाच वापर करून पाठवायचे आहे. महाराष्ट्र सर्कलचे प्रमुख पोस्टमास्तर जनरल के. सी. मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत या स्पर्धेविषयी माहिती दिली.
या स्पर्धेत ‘पर्यावरणाचा बचाव’ आणि ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ या विषयांवर आपल्या कल्पना आणि सूचना निबंध किंवा कथांच्या स्वरूपात पाठवणे अपेक्षित आहे. हे लेखन मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा फ्रेंच या भाषांमध्ये तसेच सुवाच्च असणे आवश्यक आहे, तसेच ते ए-४ आकाराच्या दोन पानांहून अधिक नसावे. हे लेखन पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र किंवा पोस्टल पाकिटातूनच पाठवायचे असून त्यासाठी टपाल सेवेचाच वापर करणे आवश्यक आहे. यात नेहमीच्या टपाल सेवेबरोबरच स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, इ- पोस्ट या माध्यमांचाही वापर करता येणार आहे. देशाबाहेरील इच्छुकांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार असून त्यासाठी त्यांना त्या- त्या देशाची टपाल सेवा वापरता येईल.
ही स्पर्धा १२ वर्षांखालील वयोगट, १३ ते १९ वर्षे, २० ते ६० वर्षे आणि ६० वर्षांवरील वयोगट अशा चार वयोगटांत घेण्यात येणार आहे. निवडक पत्रांना १५ जानेवारीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून नागरिकांच्या सूचना संबंधित सरकारी कार्यालये तसेच स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
नागरिकांनी आपल्या लेखनाबरोबर आपले नाव, इ-मेल पत्ता, भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक असून ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत हे लेखन ‘चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, दुसरा मजला, जीपीओ इमारत, मुंबई- ४००००१’ या पत्त्यावर पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी savethefuture13@gmail.com किंवा icsripune@gmail.com या इ-मेल पत्त्यांवर संपर्क साधावा, असे आवाहन टपाल खात्यातर्फे करण्यात आले आहे.