कॅनडातील कोलचेस्टर काऊन्टीचे मेयर आर्थर रॉबर्ट टेलर आणि अन्य प्रतिनिधींनी बुधवारी महापालिकेला भेट देऊन घनकचरा व्यवस्थापन तसेच पर्यावरणपूरक उपक्रम आदींबाबत महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आलेल्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेत प्रामुख्याने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा कायमस्वरूपी वापर करून कचऱ्याची समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यात आली. महापौर दत्ता धनकवडे तसेच उपायुक्त सुरेश जगताप यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. कोलचेस्टर काऊन्टीचे प्रतिनिधी थॉमस डोनाल्ड टॅगर्ट, डग्लस ह्य़ुज मॅक्लेन्स तसेच तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश उम्मत व अधिकारी वेन रिचर्ड व्ॉम्बोल्ट या वेळी उपस्थित होते. महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली. प्रगत तंत्रज्ञान वापरून कचरा प्रक्रिया करण्यावर महापालिका भर देणार असल्याचे महापौर धनकवडे यांनी या वेळी सांगितले. घनकचऱ्याचे व्यवस्थापन करताना कोणता दृष्टिकोन असावा याबाबत यावेळी आर्थर रॉबर्ट टेलर यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचेही आश्वासन दिले.