हडपसर भागात साखळीचोरीच्या सर्वाधिक घटना होणाऱ्या ठिकाणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोन्याचे दागिने घालून उभे केले. पोलिसांनी साखळीचोरांवर लावलेल्या सापळ्यात सोमवारी सकाळी दोन साखळीचोर सापडले. सोनसाखळी हिसकावून पळू लागल्यानंतर सापळा लावून उभे असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. तीन किलोमीटर पाठलाग केल्यानंतर साधना विद्यालयाजवळ पोलिसांनी चोरटय़ांना खाली पाडले. त्यांच्यासोबत खाली पडलेल्या पोलिसांवर चोरटय़ांनी चाकूने वार करून पळून जात असताना पोलीस आणि नागरिकांनी त्यांना पकडले. यामध्ये एक पोलीस अधिकारी गंभीर जखमी असून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या हाताला जखम झाली आहे.
हडपसर येथील भोसले गार्डन ते साधना महाविद्यालय दरम्यान सोमवारी सकाळी सहा ते सहा वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान हा प्रकार घडला. शहरात साखळीचोरांनी थैमान घातल्यामुळे हडपसर पोलिसांनी भोसले गार्डन जवळील अमर कॉटेज आणि सरिंम कंपनीजवळील इंदप्रस्थ सोसायटीसमोर सोमवारी सकाळी सापळा रचला. दोन महिला कर्मचाऱ्यांना सोन्याचे दागिने घालून त्या ठिकाणी उभे केले. भोसले गार्डनजवळील सापळ्यात दोन साखळीचोर सापडले. मोटारसायकलवरून आलेल्या दोन साखळी चोरांनी पोलीस कर्मचारी कुंजीर यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले आणि पळू लागले. त्या वेळी सापळा लावून बसलेले पोलीस उपनिरीक्षक प्रसाद लोणारे आणि भूषण पवार यांनी दुचाकीवरून त्या साखळीचोरांचा पाठलाग सुरु केला. दहा मिनिटांच्या चोर-पोलीस पाठलागात साधना विद्यालयाजवळ पोलीस यशस्वी झाले. त्यांनी चोरटय़ांना खाली पाडले. पण, त्यांच्याबरोबर पोलीस ही खाली पडले. खाली पडलेल्या चोरटय़ांपैकी एकाने चाकू काढून पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या पायावर वार केला. ते पळून जाऊ लागले असता त्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस नरिंीक्षक रघुनाथ जाधव व इतर पोलीस आणि नागरिकांनी त्या चोरटय़ांना पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या साखळीचोराची ओंकार शिवा राठोड (वय २०) आणि ईश्वार शिवा राठोड (वय १९, रा. राजेवाडी, चौफुला, सासवड) अशी नावे आहेत. त्यांच्याकडे मिळालेली दुचाकी ही चोरीची असून त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक महिन्यांपूर्वी चोरलेली आहे. त्यांनी शहर व जिल्ह्य़ात अनेक साखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. या दोघांच्या वडिलांवरही गुन्हे दाखल आहेत. सकाळी सापळा रचला त्या ठिकाणी या वर्षभरात चार साखळीचोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी असून त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ज्या महिलांची साखळी चोरी झाली आहे त्यांनी सहायक पोलीस आयुक्त राजन भोगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.