करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाल्याने अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवासी विमानसेवा बंद करण्यात आलेली असल्याने त्यांच्याकडे प्रवासाचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळेच पुन्हा मायदेशी परतण्यासाठी हे भारतीय केंद्र आणि राज्य सरकारांकडे मदत मागत आहे. असेच एकूण ८० भारतीय श्रीलंकेत अडकले असून २० ते २५ महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये पुण्यातील एका तरुण आहे. आपली मदत करावी अशी आर्त हाक या तरुणाने केंद्र आणि राज्य सरकारला दिली आहे.

महेश बसुडकर असं या तरुणाचं नाव आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना महेश बसुडकरने दिलेल्या माहितीनुसार, “मी आणि माझ्यासारखे जवळपास ८० भारतीय श्रीलंकेत अडकलो आहोत. २२ मार्चपासून आम्ही येथे अडकून पडलो आहोत. आमच्यापैकी अनेकांनी २२ मार्चच्या आधीचं विमानाचं तिकीट बूक केलं होतं. पण इतर कारणांमुळे ते तिकीट रद्द झालं”

“लॉकडाउनचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आम्ही येथील दुतावासाला कळवलं होतं. आमच्यासारखे अनेक भारतीय येथे अडकले आहेत. आमची लवकरात लवकर येथून बाहेर काढावं. हा लॉकडाउन अजून किती चालणार आहे माहिती नाही,” अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.

आम्ही दुतावासाशी संपर्क साधला पण आम्हाला फक्त सरकार प्रयत्न करत आहे एवढंच उत्तर दिलं जात आहे. आम्हाला दुतावासाकडून तुम्ही आलातच कशाला अशी विचारणा करण्यात आल्याचंही त्याने सांगितलं आहे. “आमचं सरकारला एवढंच म्हणणं आहे की, तुम्ही किमान पर्यटकांना तरी येथून बाहेर काढलं पाहिजे. विद्यार्थी किंवा येथे काम करणारे यांच्याकडे पर्याय आहेत. पण आमच्याकडे काहीच पर्याय नाही आहेत. सगळा खर्च आम्हालाच उचलावा लागत आहे. येथील सरकार कोणतीही मदत करण्यास तयार नाही. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असतो. आम्ही हे कितपत सहन करायचं. भारत सरकारने आमच्या खर्चाची तरी काही व्यवस्था करावी. पण सरकारकडून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत,” अशी संतप्त भावना महेश बसुडकरने व्यक्त केली आहे.

“आम्ही पर्यटक व्हिसावर असून एखाद्या पर्यटकाप्रमाणेच वेळमर्यादा आणि बजेट ठरवून आलो होतो. पण आता लॉकडाउन वाढत असल्याने भारतात पुन्हा परतण्याची शक्यता धुसर होत चालली आहे. आमचं बजेटही दिवसाप्रमाणे कमी होत चाललं आहे. भारतात लॉकडाउन वाढत चालला असल्याने आमची मानसिक आणि आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे,” असं महेश बसुडकर सांगतो.

“श्रीलंकेत अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला असल्याने येथे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हॉटेलमध्येही कर्मचारी आणि अन्नाची कमतरता निर्माण झाली आहे. कृपया या परिस्थितीची नोंद घ्या आणि आम्हाला पुन्हा परतण्यासाठी विमानाची सोय करावी अशी केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे,” अशी आर्त हाक महेश बसुडकरने दिली आहे. गरज असेल तर आम्ही विमान तिकीटासाठी २० हजार ऐवजी ४० हजार रुपये देण्यास तयार आहोत असंही त्याने सांगितलं आहे.