पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि महामार्गावर दरोडे टाकून प्रवशांना लुटणाऱ्या पिंटय़ा वाघमारेच्या टोळीतील चार जणांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) अनुसार कारवाई केली आहे. काही महिन्यांपूर्वीच महामार्ग आणि द्रुतगतीमार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या शांताराम मुकणे टोळीतील दहा जणांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे द्रुतगती मार्गावर लुटमारीच्या घटनांना चाप बसला आहे.
िपटय़ा ऊर्फ सुनील ऊर्फ इगनास दीपक वाघमारे (वय २४, रा. केळवली, नौढेवाडी, ता. खालापूर, रायगड), विजय तुळशीराम चव्हाण (वय ३५, रा िपपळोली, अंबरनाथ, जि. ठाणे), जितू मनोहर चव्हाण (वय २६, रा. नाव्हंडे, घोडवली, ता. खालापूर) व अविनाश वसंत मुकणे (वय २६, रा. सावरोली, ता. खालापूर, रायगड) अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा ग्रामीण, शहर व वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पिंटय़ा वाघमारे याची टोळी संघटितपणे गुन्हे करत होती. या टोळीने द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर दरोडे व जबरी चोरीचे सत्र सुरू केल्याने मागील काळात द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणे जिकिरीचे झाले होते. अगदी द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीपासून िपटय़ा वाघमारे व शांताराम मुकणे या टोळ्या कार्यरत होत्या. या दोन्ही टोळीने या मार्गावर थांबलेल्या प्रवशांना लुटले होते. या टोळीला लोणावळा शहर व ग्रामीणच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सहा महिन्यांपूर्वी अटक केली होती. यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्याकडे या टोळीवर मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भास्कर थोरात याचा तपास करत आहे.