जुन्या हद्दीतील वाडय़ांच्या विकासासाठी जादा चटईक्षेत्र निर्देशांक देणे आवश्यक असताना गावठाणातील चटई निर्देशांक कमी करण्यात आला आहे आणि ही महापालिका प्रशासनाने केलेली मुद्रणातील चूक असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गावठाणासाठी अडीच चटई निर्देशांक देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता अशोक हरणावळ, उपशहर प्रमुख सदानंद शेट्टी आणि राजेंद्र शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र सोमवारी महापालिका आयुक्तांना दिले. जुन्या वाडय़ांच्या विकासासाठीचा एफएसआय वाढवणे आवश्यक आहे. गावठाण भाग तसेच वाडय़ांना अडीच एफएसआय दिल्यास वाडय़ांचा विकास होईल, अशी परिस्थिती असताना जुन्या हद्दीच्या विकास आराखडय़ात मात्र गावठाण भागासाठी दीड एफएसआय प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच ही आराखडय़ाचे मुद्रण करताना झालेली चूक आहे असेही प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. हा पेठांमधील नागरिकांवर अन्याय आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
गावठाण व पेठांमधील जुन्या वाडय़ांना अडीच एफएसआय देण्यात यावा, विकसित होणाऱ्या वाडय़ांमध्ये भाडेकरूंना पाचशे चौरसफुटांचे घर देण्यात यावे तसेच जुन्या हद्दीत दर्शवण्यात आलेली अवास्तव रस्तारुंदी रद्द करावी, अशा मागण्या या पत्रातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनेला आंदोलन छेडावे लागेल, याची नोंद घ्यावी, असाही इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.