पुणे महिला संवेदनशील शहर व्हावे यासाठीचा आराखडा महापालिकेने तयार करून घेतला आहे. या अहवालातून शहरातील महिला स्वच्छतागृहांची वाईट अवस्था अधोरेखित झाली असून ती अवस्था दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतही अहवालात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी शहरात कशा पद्धतीने करायची ते आता महापालिकेला ठरवावे लागणार आहे.

चांगल्या सुविधा देण्यासाठी…
शहरातील स्वच्छतागृहांचे चित्र बदलण्यासाठी महिला संवदेनशील अहवालात अनेक उपाय सुचवण्यात आले असून त्यातील काही उपाय तातडीने अमलात आणता येण्यासारखे आहेत. अहवाल तयार करताना महिलांनी मांडलेले सर्व प्रश्न व महिलांनी केलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या असून महापालिकेचा आरोग्य विभाग आता त्यांची तातडीने अंमलबजावणी करणार का, हा खरा प्रश्न आहे.
पुणे शहर हे महिलांना आपले वाटावे तसेच हे शहर महिलांबाबत संवेदनशील असावे यासाठीच्या उपाययोजनांमध्ये महिलांना नियोजनाच्या प्रक्रियेत आणण्याबरोबरच महिलांसाठी आवश्यक सेवासुविधांची आखणी करणे, महिलांना आवश्यक सोयीसुविधा पुरवणे या बाबींचाही  समावेश आहे. त्या दृष्टीने सध्या महापालिकेत महिलांसाठी जसे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार होते तशाच पद्धतीने महिला संवेदनशील शहर बनवण्यासाठी कृती आराखडाही तयार केला जाणार आहे. महिलांसंबंधीच्या या आराखडय़ात सार्वजनिक ठिकाणी असलेली स्वच्छतागृह, वस्त्यांमधील स्वच्छतागृह, खासगी यंत्रणेकडून चालवली जाणारी स्वच्छतागृह यासह सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. महिलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे उपाय या आराखडय़ात सुचवण्यात आले आहेत ते असे…
– शहरातील गर्दीची सर्व ठिकाणे, बाजारपेठा आदी ठिकाणी येथे ठराविक अंतरावर वा ठराविक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहांची बांधणी करावी.
– दर दोन-तीन किलोमीटर अंतरावर स्वच्छतागृहाची बांधणी करावी आणि त्याचे स्थान दिसेल अशा प्रकारे जागोजागी स्थानदर्शक खुणांच्या पाटय़ा लावाव्या.
– शौचालये स्वच्छ राखली जावीत यासाठी त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि या कामासाठी तसेच स्वच्छतागृहात शुल्क गोळा करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती करावी.
– स्वच्छतागृहांमध्ये पुरेसे पाणी, हात धुण्यासाठी बेसिन, साबण, कचरा पेटी या सोयी केल्या जाव्यात.
– स्वच्छतागृहांची स्वच्छता होत आहे ना, तसेच त्यांची देखभाल केली जात आहे ना, याची खातरजमा करावी.
– शाळा, महाविद्यालयांमध्येही स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह असावीत.
– बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला तसेच मुलांसाठी असलेल्या स्वच्छतेच्या सोयींची उपलब्धता तपासली जावी तसेच त्यावर देखरेखही ठेवली जावी.
या आणि अशा अनेक सूचना करण्यात आल्या असून सूचनांची अंमलबजावणी केल्यानंतर वा करत असताना काय व किती साध्य झाले याचे मूल्यमापन होणेही आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तशी यंत्रणा महापालिकेने तयार करावी, अशीही सूचना अहवालात करण्यात आली आहे.