पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, नागरिकांचे गट आणि वैयक्तिक पातळीवर पर्यावरण दिनी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यात देशी वृक्षांचे वाटप, ई-कचरा गोळा करण्याची मोहीम, पर्यावरण जागृतीपर व्याख्याने, सांगितिक कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, प्रदर्शने, पुरस्कार वितरण या माध्यमातून हा दिन साजरा करण्यात येणार आहे.
पुण्याची वाढणारी लोकसंख्या, वाढते नागरीकरण, वाहनांची वाढणारी संख्या, झाडांची तोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास अशी शहरापुढे पर्यावरणाची आव्हाने आहेत. कचऱ्याचा उग्र बनलेला प्रश्न आणि इतर नागरी समस्यांद्वारे पर्यावरणाच्या ऱ्हासामध्ये भरच पडत आहे. या पाश्र्वभूमीवर पुण्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे जनजागृती, थेट कृती आणि प्रतिकात्मक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
देशी वृक्षांचे वाटप
पर्यावरणाबद्दल आस्था निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी वृक्षारोपण करावे यासाठी या दिनी एम्प्रेस गार्डन मित्र परिवारातर्फे देशी वृक्षांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. देशी वृक्षांची वयोमर्यादा व वादळ, वारा आणि पाऊस यात तग धरून राहण्याची क्षमता ही तुलनेने जास्त असते. म्हणून या रोपांचे ५ जून रोजी सकाळी १० ते ११.३० या वेळात एम्प्रेस गार्डन येथे वाटप करण्यात येणार आहे. डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनच्या वतीने याच दिनानिमित्त म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे दुपारी चार वाजता रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.
व्याख्यान, गप्पा आणि पुस्तक प्रकाशन
जागतिक तापमानवाढ आणि वाढते शहरीकरण या पाश्र्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन ग्रोथ’ या पुस्तकाचे प्रकाशन सेनापती बापट रस्त्यावरील एमसीसीआयए टॉवरमील नवलमल फिरोदिया सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या दिनानिमित्त नेचरवॉक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. राजेश गोपाल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. आम आदमी पार्टीने पुण्याच्या पर्यावरणाविषयी तज्ज्ञांशी गप्पांचा कायक्रम आयोजित केला आहे. तो एस.एम. जोशी सभागृहात ५.३० वाजता होणार आहे.
स्वच्छता मोहीम
पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. डहाणूकर कॉलनी परिसरात ई-कचरा गोळा करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. ती तेथील मैदानात दुपारी ४ ते सायंकाळी ७ या काळात असेल. ‘यार्दी वस्ती विकास प्रकल्प’ अंतर्गत पांडवनगर पोलीस चौकीजवळील डोंगरे सभागृहात ‘स्वच्छता दूत’ हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यात स्वच्छता दूत पुरस्कार दिला जाईल. समर्थ भारत व्यासपीठांतर्गत ‘पुणे स्वच्छता करंडक २०१५’ हे पुरस्कार दिले जाणार आहेत. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाजवळ मन:शांती दत्ता मंदिराजवळ सकाळी १० वाजता होणार आहे.
याच दिनानिमित्त ‘ग्रीन हिल्स ग्रुप’तर्फेघोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग, पोस्टर्स प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याचे उद्घाटन केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. याचबरोबर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभाग सभागृहात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा सांगितिक कार्यक्रम होणार आहे.