मुस्लीम मतांवर पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहणाऱ्या शरद पवार यांनी या देशातील हिंदू अजून जिवंत आहेत हे ध्यानात ठेवावे. तुमचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न हिंदू कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पवार यांच्यावर शरसंधान साधले.
शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा लोणावळा येथे आयोजित करण्यात आला होता; या वेळी ठाकरे बोलत होते. पक्षाचे लोकसभेतील गटनेता अनंत गीते, खासदार शिवाजीराव आढळराव, गजानन बाबर तसेच आमदार सुभाष देसाई, प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पक्षाचे आमदार व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. गटप्रमुखांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘सार्थ करुया स्वप्न बाळासाहेबांचे’ या पुस्तिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.
महाराष्ट्राचा जाणता राजा आता आयपीएलचा राजा झाला आहे. दहशतवाद्यांसोबत असणारी इशरत निष्पाप असल्याचे प्रमाणपत्र देणारे पवार शिवाजीमहाराजांच्या काळात असते, तर त्यांनी अफजलखान आणि शाहिस्तेखानालाही निष्पाप ठरवले असते, असा टोलाही ठाकरे यांनी या वेळी लगावला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या दहा दिवसांनंतरही मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आले नाही ही सरकारची नामुष्की आहे, असेही ते म्हणाले. महागाई, भ्रष्टाचार, अराजकता देशात वाढत आहे, रुपया कोसळत आहे आणि पंतप्रधान मात्र पुतळ्यासारखे उभे आहेत. अशा सरकारला हद्दपार करण्यासाठी गटप्रमुखांनी सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.