चोरलेले सोने विकत घेतल्याच्या आरोपावरून थेरगावातील सराफाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना व्यवसाय बंधूंनी धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी घडली. सराफ संघटनेचा हिसका दाखवू, खासदारांना बोलावून वर्दीच उतरवू, अशी भाषा सराफांनी वापरली. तर, खासदार गजानन बाबर यांनी चौकीसमोर धरणे आंदोलन केले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा सराफांना अटक करण्यात आली.
गणेश दुशंत सोनवणे (वय २०, रा. लुल्लानगर, पुणे)याला सोने चोरल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली. त्याने कबुलीजबाबात चोरीचा माल थेरगावातील नाकोडा ज्वेलर्स येथे विकल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी दुकानदार दिनेश मेहता यांना ताब्यात घेतले. तेव्हा अन्य सराफांनी पोलिसांशी झटापट केली. या गोंधळातच मेहतास पोलिसांनी गाडीत घालून वाकड चौकीत आणले. तोपर्यंत फोनाफोनी झाल्याने अन्य सराफ गोळा झाले. नागरिकांची गर्दी झाली. ‘तुमची वर्दी उतरवू, खासदार बाबर यांना बोलावू, तुम्हाला धडा शिकवू,’ अशी भाषा करत सराफ पोलिसांशी हुज्जत घालत होते. घटनेची माहिती मिळाल्याने बाबर वाकड पोलीस चौकीत आले. पोलीस खोटय़ा केसेस करत असल्याचा आरोप करून कारवाई मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. तथापि, पोलिसांनी नकार दिल्याने बाबरांनी तेथेच धरणे धरले. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दूरध्वनीवरून कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार, दिनेश मेहता यांच्यासह सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी महेंद्रकुमार छाजेड, पारसमल रांका, भूलचंद जैन, राजू मेहता, प्रकाश मेहता या सराफांना अटक करण्यात आली.
यासंदर्भात, उमाप म्हणाले, सोने घेऊन फरारी झालेले दोन आरोपी पोलिसांनी कोल्हापूर येथे पकडले. आरोपींनी सोनं विकत घेणाऱ्या सराफांची नावे सांगितली. याशिवाय, आरोपी दुकानात येऊन गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्यानुसार, सराफास ताब्यात घेतले जात असताना सराफांनी गोंधळ घातला व आरोपी गणेश सोनवणे यास मारहाणही केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्या सराफांना अटक करण्यात आली आहे.
सराफ चोर नाहीत – बाबर
सराफ व्यवसाय करतात, ते चोर नाहीत. त्यांना मारहाण करून पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रकार चुकीचा आहे. वास्तविक सराफांमुळे चोर पोलिसांच्या तावडीत सापडले. मात्र, पोलिसांनी दंडेलशाही केली. त्याच्या निषेधार्थ सराफांचा व्यापार बंद ठेवण्यात येणार असल्याचे खासदार गजानन बाबर यांनी पत्रकारांना सांगितले.