तो सुखवस्तू घरातील तर, ती सामान्य कुटुंबातील.. शिक्षणानिमित्त वेगवेगळ्या शहरातून आलेल्या दोघांची पुण्यामध्ये झालेली भेट.. वक्तृत्वाच्या आवडीने वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांचे परस्परांना घडलेले दर्शन.. ‘प्रथम तुज पाहता’ अशा अवस्थेतील तो.. अध्यात्म आणि संगीत हा त्यांच्या मैत्रीतील समान धागा.. तीन वर्षांत त्यांच्यामध्ये फुललेला प्रेमाचा ‘वसंत’ केवळ विवाहापुरता मर्यादित न राहता आता चक्क पुस्तकामध्ये शब्दबद्ध झाला आहे.
मंदार कारंजकर हे त्याचे तर, दाक्षायणी आठल्ये हे तिचे नाव. आपल्या प्रेमाची आणि त्याची फलश्रुती म्हणून झालेल्या विवाहाची कहाणी या दोघांनी ‘पाय- प्रेमाची किंमत काय?’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केली आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले असून या पुस्तकाच्या निमित्ताने मंदार आणि दाक्षायणी या दोघांची ही कहाणी गुरुवारी (१९ मार्च) उलगडणार आहे. या दोघांच्या प्रेमाचे साक्षीदार असलेले वसंत व्याख्यानमालेचे कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर हे त्यांच्याशी संवाद साधणार असून औंध येथील क्रॉसवर्ड येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
गणितामध्ये ‘पाय’ची किंमत अजून कोणाला कळलेली नाही. तसेच काहीसे प्रेमाचे आहे की काय, असा प्रश्न शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेल्या आम्हा दोघांना पडला होता. वसंत व्याख्यानमालेमध्ये आमची भेट झाली. त्या भेटीचे रूपांतर ओळखीमध्ये झाले. आमच्यातील परिचय वाढत गेला आणि प्रेम कधी जुळले हे दोघांनाही कळले नाही. ओशो यांचे तत्त्वज्ञान आणि संगीत हा आम्हाला जोडणारा दुवा. आमच्यातील प्रेमाचे संवाद, आध्यात्मिक चर्चा आणि अगदी सेक्ससंदर्भात आम्ही एकमेकांशी जे काही बोललो त्या साऱ्या बाबींचा अंतर्भाव या लेखनामध्ये केला आहे. एका अर्थाने ही आमची प्रेमकहाणीच आहे. ती या पुस्तकातून दोघांनीही कथन केली आहे, असे मंदार कारंजकर याने सांगितले. ही आमची प्रेमकथा असली तरी पुस्तकामध्ये कनिका आणि अजय या कल्पित नावांनी रेखाटली आहे, हेही त्याने आवर्जून सांगितले.
मुलगा रत्नागिरीचा आणि मुलगी नागपूरची. दोघे शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात काय, एका कार्यक्रमामध्ये भेटतात काय, त्यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर जागृत होतो आणि विवाहामध्ये त्या प्रेमाची परिणती अशी जगावेगळी आमची कहाणी आहे. मी फोर्ब्स मार्शल कंपनीमध्ये कॉपरेरेट कम्युनिकेशन्स विभागामध्ये काम करतो. तर, दाक्षायणी हिने एलएलबी पूर्ण केले असून ती टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस येथे एम. ए. करीत आहे. सध्या ती सावित्रीबाई फुले विद्यालय येथे शिक्षिका म्हणून काम करीत आहे. आम्ही दोघेही कीर्तन करतो, अशी माहिती मंदारने दिली. अनेकदा प्रेम केल्यावर युवक-युवती घाबरून जातात. पण, प्रेम खरे असेल तर नोकरी आणि पैसा या गोष्टी मिळू शकतात याची प्रचिती आम्हाला आली आहे. त्यामुळेच ही जगावेगळी प्रेमकथा दोघांच्याही भूमिकेतून मांडली असल्याचेही त्याने सांगितले.