पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या आराखडय़ास केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मंजुरी घेण्यात येईल. त्याचबरोबर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याबाबतच्या विविध सूचना आणि आक्षेपांबाबत फेरविचार करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याचाही निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुण्यातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या बठकीला पालकमंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार आदी उपस्थित होते.
फडणवीस यांनी सांगितले, की पुण्याची वाढती लोकसंख्या, वाढणारे शहरीकरण पाहता मेट्रो अतिशय गरजेची आहे. मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा मान्य करून त्यास केंद्र सरकारकडून मंजुरी घेऊन काम लवकर सुरू करण्यात येईल. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या आराखडय़ाबाबत विविध प्रकारची मते व्यक्त करण्यात आली आहेत. त्याचा विचार करायला हवा. ही मते आणि आक्षेपांचा फेरविचार करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीत नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, मेट्रो रेल्वेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ ई. श्रीधरन, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक, उद्योगपती अभय फिरोदिया, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विजय केळकर यांचा समावेश असेल. ही समिती एका महिन्यात याबाबतचा अहवाल सादर करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 यांनी आपली मते मांडली
बैठकीस खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, योगेश टिळेकर, जगदीश मुळीक, माधुरी मिसाळ, उपमहापौर आबा बागुल, मंगला कदम, केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाचे मुकुंद सिन्हा, प्रधान सचिव नितीन करीर, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, अर्थतज्ज्ञ विजय केळकर, अद्योगपती अरुण फिरोदिया, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.