पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती होती. मात्र उद्घाटन झाल्यावर काही वेळातच सभागृहातले छत गळू लागले. याचाच निषेध करत मनसेने पुणे महापालिकेत छत्री घेऊन आंदोलन केले. मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी छत्री घेऊन आणि रेनकोट घालून आंदोलन केले. महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. नगरसेवक साईनाथ बाबर आणि रुपाली पाटील तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी वसंत मोरे म्हणाले की,महापालिकेच्या नव्या इमारतीचे काम बाकी राहिले आहे.याची कल्पना सताधारी भाजपला अनेक वेळा दिली असताना देखील यांनी घाईमध्ये इमारतीचे उदघाटन केले आहे.त्यांच्या या घाईमुळे पहिल्याच पावसाचे पाणी छतामधून उदघाटनावेळी सभागृहात आले आहे.यातून कामाचा दर्जा समोर आला असून सर्व सामान्य नागरिकांच्या कर रूपातून आलेला पैसा देखील यांनी पाण्यात घातला आहे.या कामाला जबाबदार असणाऱ्या आधिकाऱ्यावर झाली पाहिजे.अशी मागणी त्यांनी केली.

जलयुक्त शिवार ऐकले होते, जलयुक्त उद्घाटन पाहिले नव्हते, हेच का तुमचे अच्छे दिन?  बिल्डिंग झाली ब्युटीफुल, काम मात्र डर्टीफुल हेच का तुमचे अच्छे दिन? अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.