मोबाइल टॉवर उभारण्यासाठी जागा भाडय़ाने दिल्यास एखादी कंपनी मोठय़ा रकमेचे आमिष दाखवत असेल, तर अगोदर चौकशी करा. कारण, मोबाइल टॉवर उभारण्यासाठी जागा भाडय़ाने दिलेल्या नागरिकांकडून सुरुवातीला ठेव म्हणून मोठय़ा प्रमाणात रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी दूरसंचार विभागाच्या टर्म सेलने नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. बोगस कंपन्यांच्या भुलथापांना बळी पडू नये, अशा सूचना केल्या आहेत.
दूरसंचार विभागाच्या टर्म सेलकडे अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या विभागाने एक प्रसिद्धिपत्रक काढून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, या कंपन्यांची नागरिकांना फसविण्याच्या पद्धतीची माहिती दिली आहे. वृत्तपत्रामध्ये मोबाइल टॉवर उभारण्यासाठी काही नागरिक व कंपन्यांकडून जाहिरात दिली जाते. त्यामध्ये जमीन अथवा घराच्या छतावर टॉवर उभारल्यास नागरिकांना साठ ते नव्वद हजारांपर्यंत प्रतिमहिना भाडे मिळेल, असे पैशांचे आमिष दाखविले जाते. संपर्कासाठी एक मोबाइल क्रमांक दिला जातो. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर फोन उचलणारी व्यक्ती ज्या ठिकाणी मोबाइल टॉवर उभा करायचा आहे, त्या जागेचा तपशील आणि संपर्क क्रमांक एसएमएस करायला सांगते. त्यानंतर कंपनीचा प्रतिनधी म्हणून एक व्यक्ती जागा मालकास फोन करून जागेची निवड झाल्याचे सांगतो आणि जागेची पाहणी करण्याचे खोटे आश्वासन देतो. जागेची पाहणी, नोंदणी व इतर खर्चासाठी ठरावीक रक्कम भरण्यास सांगितली जाते. रक्कम भरल्यानंतर जागा मालकास बनावट कागदपत्रे पाठविली जातात. काही दिवसांनंतर पुन्हा जागा मालकास फोन करून टॉवर उभारण्यासाठी वैयक्तिक बँक खात्यामध्ये लाखो रुपये ठेव म्हणून भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर ही रक्कम ताबडतोब काढून संपर्कासाठी दिलेला मोबाइल क्रमांक बंद करून नागरिकांची फसवणूक केली जाते. अशा अनेक घटना दूरसंचार विभागाच्या टर्म सेलच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा कंपन्यांच्या भूल थापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. पुणे शहरात अशा घटना घडल्यानंतर काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.