25 February 2021

News Flash

रतन टाटांशी वयापलीकडच्या मैत्रीची गोष्ट

पुणेकर शंतनू नायडूच्या पुस्तकातून टाटांच्या व्यक्तिमत्त्वाचे नवे पैलू समोर

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती बिसुरे

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांना किमान ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावे, अशी प्रत्येक सर्वसामान्य भारतीयांची इच्छा असते. परंतु तशी संधी फारच थोडय़ा जणांना मिळते. पुणेकर शंतनू नायडूला मात्र टाटांना केवळ बघण्याचीच नाही, तर त्यांच्याबरोबर काम करण्याचीही संधी मिळाली. त्यातून टाटांशी झालेल्या मैत्रीची गोष्ट शंतनूने त्याच्या ‘आय केम अपॉन अ लाइटहाऊस’ या पुस्तकातून उलगडली आहे.

अभिनव शाळा आणि आपटे प्रशालेतून शिक्षण पूर्ण केलेला शंतनू हा पुणेकर तरुण सध्या रतन टाटा यांच्याबरोबर टाटा ट्रस्टमध्ये काम करतो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना रस्त्यावर वाहनांची धडक बसून होणारे कुत्र्यांचे मृत्यू रोखण्यासाठी शंतनूने रंगीत, चमकदार पट्टे बनवले. त्याच्या या कल्पनेने टाटा आणि शंतनू या दोन श्वानप्रेमींना एकत्र आणले आणि आता त्यांच्या मैत्रीला अगदी वयाचंही बंधन राहिले नाही. ‘मोटोपॉव्ज’ या शंतनूने प्राण्यांसाठी सुरू केलेल्या नवउद्योगामध्येही टाटांनी गुंतवणूक केली आहे. ‘हार्पर कॉलिन्स’तर्फे  प्रकाशित झालेल्या शंतनूच्या पुस्तकासाठी टाटा यांनी प्रस्तावनाही लिहिली आहे.

शंतनू सांगतो, माझे वडील ‘टाटा अ‍ॅडव्हान्सेस सिस्टीम्स’मध्ये काम करतात. आई शिक्षिका आहे. पुस्तकांसाठी चित्रे रेखाटणारी संजना देसाईही पुण्याची आहे. २०१४ मध्ये मी रतन टाटा यांच्या संपर्कात आलो. पुस्तक लिहिण्याची कल्पना मी टाटा यांच्यासमोर मांडली. त्याच वेळी ज्येष्ठ उद्योगपती असण्यापलीकडे जाऊन मला दिसलेले, भेटलेले रतन टाटा यांच्याबद्दल मी लिहिणार आहे, हे त्यांना सांगितले. आम्ही दोघांनी एकत्र घालवलेला वेळ, केलेले कार्यक्रम-उपक्रम आणि मला दिसलेल्या रतन टाटा या ‘माणसाच्या’ छटा मी शब्दबद्ध केल्या आहेत. टाटा यांनी

आवर्जून काही शिकवण्यापेक्षा त्यांना काम करताना, त्यांच्याबरोबर वावरताना पाहूनच असंख्य गोष्टी मी शिकतो.

रतन टाटा या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात, भटक्या कुत्र्यांसाठी मित्रांबरोबर सुरू करत असलेल्या नवउद्योगाबद्दल माहिती देणारे पत्र शंतनूने मला लिहिले होते. रस्ते अपघातात कुत्रे दगावू नयेत म्हणून त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी रंगीत चमकदार पट्टे तयार करण्याच्या शंतनूच्या कल्पनेचे कौतुक वाटल्यामुळेच त्या वेळी त्याच्या नवउद्योगात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

आश्वासनपूर्ती.. :  वयापलीकडे जाऊन रतन टाटा आणि शंतनू यांच्यातील मैत्री या पुस्तकातून दिसून येते. शंतनू एमबीए करण्यासाठी न्यूयॉर्क मधील कॉर्नेल विद्यापीठात गेला तेव्हा त्याच्या पदवीप्रदान समारंभाला उपस्थित राहण्याचे आश्वासन टाटांनी त्याला दिले आणि ते पाळलेही. आपले खासगीपण अत्यंत जपणारे टाटा शंतनूबरोबर त्याच्या हट्टासाठी ‘कपकेक’ कापून वाढदिवस साजरा करतात. करोनाकाळात आपला हा तरुण मित्र व्हिटॅमिनची गोळी घेतोय, यावर प्रेमळ लक्षही ठेवतात. जगातील सर्वश्रेष्ठ उद्योगपतींच्या यादीत बहुमानाने झळकणाऱ्या रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे अनोखे पैलू शंतनूने आपल्या पुस्तकातून वाचकांसमोर आणले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 12:23 am

Web Title: new aspects of tata personality emerge from pune based shantanu naidu book abn 97
Next Stories
1 लॉकडाउनमुळे तुटलेलं ‘ते’ नातं पुणे पोलिसांमुळे पुन्हा जोडलं गेलं
2 “निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय”; अजित पवार संतापले
3 पुण्यात १२२९ रोड रोमियोंविरोधात दामिनी पथकाकडून कारवाई; पुणे पोलिसांचं सर्वसामान्यांकडून कौतुक
Just Now!
X