कांदा किंवा लसणीचे पापुद्रे किंवा टरफलं.. ‘सुंदर’ या शब्दाच्या जवळपासही जाऊ नयेत, अशी दिसणारी. मात्र, याच टरफलांपासून रेखाटण्यात आलेली निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या कोलाज चित्रांच्या ‘पिल्स आर्ट’ या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कांदा आणि लसणाच्या पापुद्र्यांच्या कोलाजपासून संजय शिंदे यांनी चित्रे रेखाटली आहेत. या टरफलांमध्ये रंगाच्या अनेक छटा मिळतात. त्याशिवाय ही टरफले वाळवून, भाजून त्यातून आणखी काही छटा शिंदे यांनी तयार केल्या. टरफले, त्याचे तुकडे, पूड तयार करून त्यातून ही चित्रे रेखाटण्यात आली आहेत. यातील अनेक चित्रांना कोणतेही इतर रंग वापरण्यात आलेले नाहीत. शिंदे यांचा भेटकार्डे तयार करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये विक्रमी नोंद होण्यापर्यंत पोहोचला आहे. निसर्गचित्रे, ऐतिहासिक प्रसंगांवरील चित्रे, व्यक्तिचित्रे अशी तिनशेहून अधिक चित्रे शिंदे यांनी रेखाटली आहेत. भारत सरकारच्या हस्तकला विभागातही या कोलाज चित्रांची नोंद करून ठेवण्यात आली आहे.
हा जरा वेगळा असा चित्रप्रकार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. या कोलाज चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व कलादालन येथे २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांच्या हस्ते होणार आहे.