ऑनलाईन खरेदी करताय.. नोकरी डॉट कॉम किंवा रोजगार डॉटवरून नोकरीचा ईमेल आलाय.. बँकेकडून तुम्हाला पासवर्डची विचारणा होतेय.. तर थांबा, अतिघाई करू नका! कारण, हा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकतो. अलीकडे गुन्हेगारांकडून अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले असून, त्याबाबत पुणे सायबर शाखेकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कोणताही ऑनलाईन व्यवहार, ई-मेलवरून नोकरीसाठी पैसे भरताना सावधानता बाळगा.. आपल्या बँकेचा पासवर्ड फोनवर कोणालाही देऊ नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरींग (सीएमई) चे कर्नल संजीव शेखर (वय ५१, रा. सीएमई, दापोडी) यांची इंटरनेट बँकिं गद्वारे पाच लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार गेल्या आठवडय़ात उघडकीस आला. शेखर यांना एका व्यक्तीने फोन करून इंटरनेट बँकिंगची तपासणी करण्यासाठी ‘वन टाईम पासवर्ड’ देण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यावरील पाच लाख रुपये जबलपूर येथील एका आयसीआयसीआय बँकेतील खात्यावर हस्तांतर केल्याचे आढळून आले. गेल्या काही महिन्यात या पद्धतीने अनेकांची फसवणूक झाली आहे.
बँका ग्राहकांना माहिती मागत नाहीत
बँका ग्राहकांना कधीही त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती मागत नाहीत. कारण, त्यांना ग्राहकांच्या खात्यात बदल करायचे असतील तर त्यांना अधिकार असतात. बँकेच्या पासवर्ड वरून ते आपल्या खात्यात बदल करू शकतात. त्यामुळे बँकांकडून कधीही खात्याची माहिती मागितली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी फोन किंवा इमेलवर कधीही आपल्या बँकिंग खात्याची माहिती कोणाला देऊ नये. बँकांनी जरी खात्याची माहिती मागितली तरी फोन कधीच देऊ नये. त्यासाठी बँकेत जाऊन चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाही करावी.
नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक
नोकरी डॉट कॉम आणि रोजगार डॉट कॉम सारख्या संकेतस्थळाच्या नावाने बनावट ईमेल तयार करून तरुणांना नोकरी लावणारे अनेक ईमेल येत आहेत. या ईमेलवरून नोकरी लावण्यासाठी ऑनलाईन एका खात्यावर एक ते दोन लाख रुपये भरण्यास सांगितले जातात. पैसे भरल्यानंतर तत्काळ त्या खात्यावरून पैसे काढून तरुणांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे तरुणांनी अशा ईमेलची खात्री झाल्याशिवाय पैसे भरू नयेत.
‘ऑनलाईन खरेदी करताना सावधान’
‘‘अनेक वस्तूंची ऑनलाईन खरेदी केल्यास सवलतीचे आमिष दाखविले जाते. वस्तू निम्म्या किमतीत येत असल्यामुळे ग्राहकांकडून दोन तीन वस्तू ऑनलाईन खरेदी केल्या जातात. मात्र, खरेदी केल्यानंतर त्या वस्तू ग्राहकांना मिळत नाहीत. अशा प्रकराच्या सुद्धा काही तक्रारी सायबर शाखेकडे आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी. नागरिकांना आपली फसवणूक होत असल्याचे दिसून आल्यास तत्काळ माहिती द्यायची असेल, तर सायबर शाखेच्या ०२०-२६१२३३४६ किंवा १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिल्यास त्यांना मदत केली जाईल,’’ असे सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एम. बाबर यांनी सांगितले.