पुणे : विमानतळावर परदेशातून पाठवलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी कोरेगाव पार्क भागातील एका ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. २६ एप्रिल रोजी ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्याने संपर्क साधला. फेडेक्स कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून आकाशकुमार बोलत असल्याची बतावणी चोरट्याने केली. मुंबई विमानतळावर फेडेक्स कुरिअर कंपनीकडून पाठविण्यात आलेले पाकिट सीमाशुल्क विभागाने (कस्टम) जप्त करण्यात आले आहे. पाकिट अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी मुंबईतील अमली पदार्थ विभागात (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाई टाळायची असेल तर एक ॲप डाऊनलोड करा, असे चोरट्याने सांगितले. बँक खात्याची माहिती चोरट्याने घेतली. बँक खात्याची माहिती पडताळण्यासाठी तुमच्या खात्यातील सर्व पैसे माझ्या खात्यात पाठवा, अशी बतावणी चोरट्याने केली.
हेही वाचा…अजित पवार म्हणाले, ‘नथुराम गोडसेंची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंना…’
चोरट्याच्या सांगण्यावरुन महिलेने चोरट्याच्या खात्यात दोन कोटी ८० हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील तपास करत आहेत.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सक्त वसूली संचलनालय (ईडी) अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भिती दाखवून चोरट्यांनी आतापर्यंत नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारची फसवणूक करण्याचे गुन्हे वाढीस लागले असून, नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या दूरध्वनीला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.