महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच नगरसेवक उभे ठाकले असून स्थायी समितीच्या कारभाराविरुद्ध धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे. तसे पत्रही शुक्रवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले.
स्थायी समितीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याबद्दलची तक्रार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बराटे यांनी पवार यांच्याकडे केली असून स्थायी समितीच्या कारभाराविरुद्ध २८ जुलै रोजी महापालिका भवनातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्याचा इशारा बराटे यांनी दिला आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेऊन प्रभागात व शहरात कशा पद्धतीने काम करावे याबाबत आपण सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांना आठवडाभरताच हरताळ फासण्यात आला आहे. त्यामुळे मला माझ्या प्रभागातील नागरिकांची कामे होण्यासाठी नाइलाजाने मोर्चे, धरणे यासारखा मार्ग अवलंबण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असेही बराटे यांनी पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
महापालिका अंदाजपत्रकात ज्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात येते, त्यातील अनेक कामे विविध कारणांनी होणार नाहीत असे लक्षात येते. त्यामुळे त्या कामांना तरतूद करण्यात आलेला निधी अन्य कामांना वळवण्यासाठी नगरसेवकांकडून निधीचे वर्गीकरण करण्याचे प्रस्ताव देण्यात येतात. सर्वपक्षीय नगरसेवकांनी मिळून असे पन्नासहून अधिक प्रस्ताव स्थायी समितीला दिले असून त्यांना समितीने मंजुरी द्यावी अशी नगरसेवकांची अपेक्षा होती. यापूर्वी देण्यात आलेले वर्गीकरणाचे अनेक प्रस्ताव निर्णयाअभावी पडून आहेत. हे प्रस्ताव मंजूर न करता त्याबाबत स्थायी समितीच्या खास सभेत निर्णय घ्यावा असा निर्णय स्थायी समितीमध्ये गुरुवारी घेण्यात आला.
प्रभागात विकासकामे व्हावीत यासाठी नगरसेवक वर्गीकरणाचे प्रस्ताव देतात. मात्र स्थायी समितीमध्ये गेले काही महिने हे प्रस्ताव मान्य झालेले नाहीत. तसेच ते मंजूर न करण्याचे कारणही सांगितले जात नाही. नगरसेवकांचा हक्क पालिका पदाधिकाऱ्यांकडून डावलला जात आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे पक्षाच्या नगरसेवकांना न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे, अशीही तक्रार बराटे यांनी पत्रातून केली आहे.