शहरातील अधिकाधिक नागरिकांनी मिळकत कर भरावा यासाठी मिळकत कर घरी येऊन स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेने सुरू केली असून ३१ मे पर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख, उपायुक्त सुहास मापारी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मिळकत कराची देयके नागरिकांना वाटण्याची प्रक्रिया महापालिकेने केली असून ३१ मे पर्यंत कर भरल्यास पाच ते दहा टक्के सवलत दिली जाणार आहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच संपर्क कार्यालयांमध्ये आणि महापालिका मुख्य भवनात कर स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील काही दिवस महापालिकेचे कर्मचारी मिळकत कर घरी येऊनही स्वीकारणार आहेत.
शहरातील सोसासटय़ा, अपार्टमेंट, मोठे गृहप्रकल्प येथील रहिवाशांनी एकत्र येऊन मिळकत कराचे धनादेश वा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) दिल्यास ते स्वीकारण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्ष सोसायटीत वा अपार्टमेंटमध्ये येणार आहेत. सोसायटी वा अपार्टमेंटमधील रहिवाशांना एकत्रितरीत्या मिळकत कर भरता यावा यासाठी ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोसायटी, अपार्टमेंट, गृहप्रकल्पांचे अध्यक्ष, चिटणीस वा अन्य पदाधिकारी, सभासद यांनी एकत्र येऊन कराची रक्कम धनादेशाद्वारे दिल्यास तत्काळ पावतीही दिली जाणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी किमान पाच धनादेश देणे आवश्यक आहे. ज्या सोसायटय़ांमधील सभासद एकत्र येऊन मिळकत कराची रक्कम धनादेशाद्वारे देऊ इच्छितात, त्यांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधल्यास त्यांनी ही सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध होऊ शकेल. संपर्कासाठी- आदित्य कासट- ९५९५६६४४४४ किंवा नितीन दहिभाते- ९०२८८७७५१५.
या संधीचा फायदा घेऊन मिळकतधारकांनी ३१ मे पूर्वी कर भरून मिळकत करातील पाच ते दहा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.