जगावेगळ्या शकला लढवून नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणाऱ्या नव्या कंपन्यांची संख्या पुण्यात वाढल्याचे दिसून येत आहे. ‘सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे (सीप) आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पुणे कनेक्ट’ या परिषदेत यंदा तब्बल ४६ नव्या कंपन्या आपली उत्पादने समोर ठेवणार आहेत. २०११ मध्ये या परिषदेत केवळ १० उदयोन्मुख कंपन्या निवडल्या गेल्या होत्या. ही संख्या यंदा ३६ ने वाढली आहे.  
काहीतरी नावीन्यपूर्ण कल्पना वापरून उत्पादने बनवणाऱ्या लहान कंपन्यांना आपले उत्पादन या क्षेत्रातील प्रथितयश व्यावसायिकांसमोर आणि गुंतवणूकदारांसमोर ठेवता यावे यासाठी चार वर्षांपूर्वी ‘पुणे कनेक्ट’ परिषदेला सुरूवात केल्याची माहिती ‘सीप’चे माजी अध्यक्ष गौरव मेहरा यांनी दिली. या परिषदेत एंटरप्राईज सॉफ्टवेअर, मोबाईल, इ- कॉमर्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, कचरा पुनर्वापर अशा विविध क्षेत्रांत या कंपन्यांनी बनवलेली उत्पादने पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी हॉटेल वेस्टिन येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळात ही परिषद होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही परिषद जेवणाच्या सुटीनंतर विनामूल्य खुली असून त्यांना ‘पुणे कनेक्ट डॉट कॉम’ या संकेतस्थळावर जाऊन परिषदेसाठी आगाऊ नोंदणी करावी लागेल.
मेहरा म्हणाले, ‘‘या वर्षी आमच्याकडे पुण्यातील ११४ नवीन कंपन्यांचे अर्ज आले होते. त्यातून ४६ कंपन्या निवडल्या गेल्या. या कंपन्यांच्या निवडीसाठी काही निकष ठेवण्यात आले होते. कंपनी अगदी नवीन असण्याबरोबरच त्यांच्याकडे केवळ नवीन कल्पनाच नसावी तर त्यांचे उत्पादन तयार असावे अशी अट घालण्यात आली होती. तसेच, ते उत्पादन प्रायोगिक तत्त्वावर वापरता येते का हेदेखील तपासले गेले. या नव्या कंपन्यांना परिषदेत सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारलेले नाही. याशिवाय पुण्यातील आणखी २० मोठय़ा कंपन्यांचे सादरीकरणही या वेळी बघायला मिळेल. ज्यांनी लहान प्रमाणात व्यवसाय सुरू करून आता मोठे नाव मिळवले आहे अशा कंपन्या या सत्रासाठी निवडल्या गेल्या.’’ सध्या १२५ सॉफ्टवेअर कंपन्या ‘सीप’च्या सदस्य असून यातील २५ कंपन्या चालू वर्षीच संस्थेत समाविष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.