महापालिकेच्या मिळकत कराची तब्बल २७ कोटी ७५ लाखांची थकबाकी सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाकडे असल्याचे स्पष्ट झाले असून तशी देयके (बिले) महापालिकेने आता विद्यापीठाला पाठवली आहेत. त्या बरोबरच विद्यापीठातील अनधिकृत बांधकामांपोटी तडजोड शुल्क व दंडापोटी विद्यापीठाने १४ कोटी ५८ लाख रुपये भरावेत, असेही पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने विद्यापीठाला दिले आहे.
विद्यापीठातील अनेक इमारतींची बांधकामे परवानगी न घेताच झाल्याची तसेच अनेक इमारतींचा मिळकत कर गेल्या दहा-पंधरा वर्षांत भरला गेल्या नसल्याची तक्रार ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर आणि प्रा. अतुल बागूल यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यात आल्यानंतर तक्रारीत तथ्य अढळले असून विद्यापीठातील ११ इमारतींचा मिळकत कर गेली दहा ते पंधरा वर्षे भरण्यात आला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. या तक्रारीमुळे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने आता विद्यापीठाला मिळकत कराची बिले पाठवली आहेत. ज्या मिळकतींची बिले पाठवण्यात आली आहेत, त्यातील एकूण थकबाकी २७ कोटी ७५ लाख १६ हजार ५०३ रुपये इतकी आहे.
विद्यापीठाने अनेक इमारती महापालिकेची परवानगी न घेताच बांधलेल्या असून काही इमारतींना पूर्णत्वाचा दाखला घेण्यात आलेला नाही, अशीही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार तपासणी केली असता अशी प्रकरणे आढळून आली आहेत. मंजूर बांधकाम परवानगी प्रस्तावांना महापालिकेने आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारलेले नाही. जागेवर काही इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करण्यापूर्वी विद्यापीठाने महापालिकेची लेखी परवानगी घेणे कायद्याने आवश्यक होते. त्यानुसार विद्यापीठातील मंजूर व तत्त्वत: मंजूर बांधकाम प्रस्तावांसाठी विकास निधी तसेच उपकर, एलबीटी, कॉलम खोदाई, राडारोडा, तडजोड/दंड शुल्क मिळून १४ कोटी ५८ लाख २५ हजार ८६० रुपयांची मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने हे पत्र विद्यापीठाला दिले आहे.
विद्यापीठातील अकरा इमारतींचा मिळकत कर थकल्याचे सिद्ध झाल्यानंतरही महापालिकेचा मिळकत कर विभाग थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याची तक्रार वेलणकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, की वसुलीसाठी तातडीने प्रयत्न होणे आवश्यक आहे तसेच आतापर्यंत मिळकत कराची बिले का पाठवली जात नव्हती याचीही माहिती मिळाली पाहिजे. थकबाकी असूनही वसुलीसाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.