उत्साह, जल्लोष, थोडीशी खुन्नस. स्पर्धकांची घाई गडबड आणि संयोजकांची शिस्त अशा वातावरणात सुवर्ण महोत्सवी वर्षांतील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी मंगळवारपासून सुरू झाली. या वर्षी चार नवे खिलाडी या स्पर्धेत उतरले आहेत.
महाराष्ट्र कलोपासकच्या वतीने पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. ऑगस्ट महिना म्हणजे पुरुषोत्तम करंडक हे पुण्याच्या महाविद्यालयांमध्ये रुजलेले समीकरण! या वर्षी या स्पर्धेचे पन्नासावे वर्ष आहे. औपचारिक उद्घाटन समारंभाचा कोणताही बडेजाव न करता रंगभूमीची पूजा करून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची जल्लोषात सुरुवात झाली. स्पर्धकांचा उत्साह. प्रतिस्पर्धी महाविद्यालयाला चिडवा चिडवी. आपल्या महाविद्यालयाच्या संघासाठी चिअरिंग. त्यासाठी तयार केलेल्या वेगवेगळ्या घोषणा. अशा जल्लोषात भरत नाटय़ मंदिराचे आवार पुन्हा एकदा बुडून गेले.
 राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘वर्तुळ’ एकांकिकेने या वर्षीच्या स्पर्धेची सुरुवात झाली. गेली अनेक वर्षे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत आपले नाव राखून असलेल्या फग्र्युसन महाविद्यालय आणि आयएमसीसी महाविद्यालयांचे सादरीकरणही पहिल्या दिवशी झाले. या वर्षी या स्पर्धेत चार नवी महाविद्यालये सहभागी झाली आहेत. एआयएसएसएम कॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही तीन महाविद्यालये पुरुषोत्तममध्ये पहिल्यांदाच सादरीकरण करणार आहेत, तर अभिनव कला महाविद्यालय अनेक वर्षांनंतर पुन्हा पुरुषोत्तममध्ये सहभागी झाले आहे. एकूण ५१ महाविद्यालयांमध्ये प्राथमिक फेरी रंगणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या वर्षी प्राथमिक फेरीचे परीक्षण अश्विनी परांजपे, पौर्णिमा गानू आणि प्रवीण तरडे करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी १३ आणि १४ सप्टेंबरला होणार आहे. प्राथमिक फेरीतून नऊ महाविद्यालयांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात येणार आहे.