अहमदाबाद पुणे-दुरंतो एक्सप्रेसमध्ये प्रवाशाचे साहित्य चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा मध्य रेल्वेमध्ये हेल्पर म्हणून कामाला असून पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख २१ हजार रुपयांचा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.
दत्तात्रय दगडू बावीसकर (वय ५४, रा. पुणे) यास अटक करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरेंद्रसिंग राठोड (वय २५, रा. अहमदाबाद) हे २६ डिसेंबरला पुणे-दुरंतो एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. त्यावेळी  राठोड हे सकाळी झोपेतून जागे झाल्यानंतर ते बाथरूमला गेले. या काळात त्यांची काळ्या रंगाची बॅगही कोणीतरी चोरून नेल्याचे आढळून आले. या बॅगमध्ये दहा अॅपल कंपनीचे आयपॉड असा एकूण तीन लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला होता. त्यानुसार पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. पवरे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून बावीसकर याला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर हा गुन्हा त्यानेच केल्याचे आढळून आले. त्याच्या घरामध्ये दहा अॅपल कंपनीचे आयपॉड पोलिसांना मिळाले. चोरीचा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्याने अशा पद्धतीने आणखी काही चोऱ्या केल्यात का याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवरे हे करीत आहेत.