06 July 2020

News Flash

राज ठाकरे यांचा पिंपरी दौरा लांबणीवर

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर येणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित पिंपरी दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये चलबिचल आहे.

| November 3, 2014 03:10 am

तिकीटवाटपावरून मनसे शहरप्रमुखाने पक्षश्रेष्ठींवरच केलेले गंभीर आरोप, तीनही मतदारसंघातील उमेदवारांची अनामत जप्त, गटबाजी, विस्कळीत यंत्रणा, अशी परिस्थिती असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर येणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नियोजित पिंपरी दौरा लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे मनसैनिकांमध्ये चलबिचल आहे. तथापि, लवकरच राज पिंपरीत येतील, असे स्थानिक नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेच्या २००७ च्या निवडणूक प्रचारासाठी राज पिंपरीत आले होते. त्या निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नव्हती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार नव्हते. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत राज शहराकडे फिरकले नाहीत. मात्र, तरीही मनसेचे चार  नगरसेवक निवडून आले व अनेक उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली. लोकसभा निवडणुकीत चिंचवडला मनसे-शेकापच्या उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी ते चिंचवडला आले होते. काही खासगी कार्यक्रमांना ते येऊन गेले. तथापि, मनसेच्या कार्यक्रमांसाठी ते आले नव्हते. राज यांनी शहरात यावे, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात मनसेची अनामत रक्कम जप्त झाली. पक्षातील गटबाजी उफाळून आल्याचे व पक्षयंत्रणा विस्कळीत असल्याचे निवडणुकीत दिसून आले. भोसरीत उमेदवारीवरून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप शहरप्रमुख मनोज साळुंके यांनीच केल्याने खळबळ उडाली होती. शिवाय, त्यांनी अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांचा उघडपणे प्रचार केला होता. ठाकरे यांच्या अनधिकृत बांधकामांविषयीच्या वक्तव्यावरून शहरात बरेच राजकारण झाले होते. राज यांनी शहरात येऊन त्याविषयीची भूमिका विस्ताराने मांडावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यास प्रतिसाद मिळू शकला नाही. या सगळ्या पाश्र्वभूमीवर राज दोन दिवसांसाठी शहरात येणार होते. तथापि, त्यांचा दौरा लांबणीवर पडला आहे.

राज ठाकरे यांना पुण्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे. निर्धारित वेळेत ते शक्य होत नसल्याने त्यांनी पिंपरी दौरा लांबणीवर टाकला आहे. तथापि, तो रद्द झालेला नाही, त्याची रूपरेषा लवकरच जाहीर करू.
– अनंत कोऱ्हाळे, गटनेते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2014 3:10 am

Web Title: raj thackeray tour mns party worker
टॅग Mns,Raj Thackeray,Tour
Next Stories
1 माहिती अधिकार कायदा असूनही माहिती मिळवणे अवघडच!
2 बंदी असलेल्या ‘पेस्ट कंट्रोल’ औषधाच्या वापरामुळे तरुणाचा मृत्यू
3 पुणे होणार टुरिस्ट हब
Just Now!
X